करोनाव्यतिरिक्त रुग्णांबाबत प्रशासन गंभीर
पालिका आयुक्तांचे खासगी रुग्णालयांना आदेश
पुणे – करोनाचे कारण देत बहुतांश रुग्णालये इतर आजार तसेच अपघातग्रस्तांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगत उपचार नाकारत आहेत. अशा रुग्णांना उपचारांसाठी फिरावे लागत आहे. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे करोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांवर तातडीने उपचार करा, अन्यथा थेट साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबतची नोटीसही महापालिकेने सर्व रुग्णालयांना पाठवली आहे. करोना रुग्णांवर उपचारांसाठी महापालिकेने शहरातील प्रमुख 86 पैकी 19 रुग्णालयांशी करार केला आहे. तर, खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची प्रक्रियाही महापालिकेने सुरू केली आहे.
मात्र, शहरात सध्या अनेक रुग्णालये करोनाव्यतिरिक्त रुग्ण तसेच अपघातग्रस्तांना उपचार नाकारत आहेत. त्यासाठी बेड शिल्लक नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत.
रुग्णालयात बेड उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड
करोना रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयांत उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्त यांनी डॅशबोर्ड स्थापन केला आहे. ही सुविधा लिंकवर संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध आहे. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे. नागरिकांना डॅश बोर्डची माहिती मोबाईल ऍपद्वारे पाहता येण्यासाठी काम सुरू आहे. लवकरच ही सुविधा मोबाइल ऍपद्वारे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.