नातवाचे ऐकल्यास खाली पाहण्याची वेळ येणार नाही -धनंजय मुंडे

 धनंजय मुंडे; पाथर्डीत आ. जगतापांची सभेने प्रचाराची सांगता

पाथर्डी: पाथर्डी माझी आजी असून स्व.गोपीनाथ मुंडेंनी जेवढे प्रेम केले, तेवढेच प्रेम आपलेही आजीवर आहे. गेली अनेक वर्ष आजी नातीचे (पंकजा मुंडे) ऐकत आहे. यावेळी नातवाचे (धनंजय मुंडे) ऐका व संग्राम जगताप म्हणजे मी उभा आहे, असे समजुन लोकसभेत पाठवा, तुमच्यावर खाली पाहण्याची वेळ येवू देणार नाही, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

पाथर्डी येथील बाजार समितीच्या आवारात आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या सांगता सभेप्रसंगी मुंडे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी संग्राम जगताप, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखऱ घुले, ऍड. प्रताप ढाकणे, सत्यजीत तांबे, राजेंद्र फाळके, दादासाहेब मुंडे, पांडुरंग अभंग, अँड.शिवाजी काकडे, हर्षदा काकडे, प्रभावती ढाकणे, संभाजी पालवे, सतिश पालवे, सुभाष घोडके उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, पंकजा मुंडेना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता मिळाली. आता फक्त मोदींना हटवुन पंकजांना व अमित शहांना हटवुन प्रितम मुंडेंना बसवायचे शिल्लक राहीले आहे. पाथर्डी तालुका फक्त भावनिक राजकारण करायचं. स्वर्गीय मुंडेंच्या मोठ्या भावाला बाजूला करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर पंकजा ताई तुम्हाला द्यावा लागेल. 2009 साली पन्नास हजार लोकांसमोर माझी उमेदवारी जाहीर केली. मुंडेंनी नंतर निर्णय बदलला. निर्णय स्वीकारून जीपवर चढून तुमच्या नावाची पहिली घोषणा देणारा धनंजय मुंडे होता. स्वर्गीय मुंडेंच्या पोटी तुम्ही जरूर जन्म घेतला. मात्र 22 वर्ष त्यांना सावलीसारखी साथ दिल्याने त्यांचे स्वप्न मला माहित आहेत. सर्व सत्ता असूनही पाथर्डीकरांना भावनेच्या राजकारणाशिवाय तुम्ही काही देऊ शकले नाही. ऊसतोडणी कामगारांची संख्या तुम्ही कमी करू शकले नाहीत.

गोपीनाथ गडाचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्र्यांनी स्व. मुंडेंच्या नावाने ऊसतोडणी महामंडळाची घोषणा केली. गेली चार वर्ष शोधूनही महामंडळाचे कार्यालय कुठे आहे. याचा तपास लागला नाही.शेवटी स्व. मुंडेंच्या नावाने सुरू झालेले महामंडळ बंद करण्यात आले. विधिमंडळात या निर्णयावर सही करताना तुमचा हात कसा थरथरला नाही. तुमच्या जागी मी असतो तर सरकार उलथून टाकलं असतं मात्र स्व. मुंडेंच्या नावाने सुरू झालेले महामंडळ बरखास्त होऊ दिले नसतं. स्व.मुंडेंचा तुम्ही असा वारसा चालवता का? असा सवालही मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंडे म्हणाले, मी राज्यातील दहा मंत्र्याचे नव्वद हजार कोटीच्या भ्रष्टचाराची प्रकरणे पुराव्यासह सभागृहात मांडली मग राधाकृष्ण विखे तर विधानसभेचे विरोधीपक्षनेते होते त्यांनी एकही घोटाळा का बाहेर काढला नाही. त्यांनी चंद्रपुरला दारुबंदी झाली त्यावर न्यायालयात जाण्याचे काम केले. कारण प्रवरेची देशी दारुला चंद्रपुरात चांगली मागणी होती म्हणुन ते न्यायालयात गेले. पंकजा मुंडे आणि कुजय (सुजय) विखे हे भाऊ बहिण कसे हे समजले नव्हते, मात्र आता समजले की प्रवरा देशी बनविते आणि आमच्या बहीनीच्या मालकाचा औरंगाबादला विदेशी दारु तयार करण्याचा कारखाना आहे. त्यामुळे हे बहीण भाऊ झाले असतील, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.

आ. थोरात म्हणाले, विखे कोणत्याही विचारांशी नाही तर ते स्वार्थांशी बांधील आहेत. प्रवरेची यंत्रणा तुमच्याकडे येवुन बसेल आणि ग्रामपंचायत व सेवा संस्थेत तुम्हाला कोणाला अध्यक्ष व सरपंच करायचे याचा अधिकार राहणार नाही. ते विळद घाटात घेवुन जातील आणि मग तुम्हाला घाटात काय होत हे माहिती असेल. सुजय विखे भाजपत गेले आता त्यांचे आई-वडीलही लवकरच भाजपत जाऊ द्या, कारण ते ज्यांच्या पदरात जातील तो पदरच जाळतात. ते भाजपत गेले की आमचे मित्र होतील.असे आ. थोरात म्हणाले. प्रस्ताविक प्रताप ढाकणे यांनी केले.शिवशकंर राजळे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.