चुकीचे बटण दाबाल, तर पश्‍चाताप होईल : आ. कोल्हे

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत युती शासनाने विकासाचा धडाका लावला असून, कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही चुकीचे बटण दाबाल, तर पश्‍चातापाची वेळ येईल, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

तालुक्‍यातील अंजनापूर, रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, बहादरपूर, शहापूर, पोहेगाव व सोनेवाडी या भागात आमदार कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसमवेत बैठका घेऊन पाच वर्षांत केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, रांजणगाव देशमुख ते कोऱ्हाळे रस्ता भूमिपूजन ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण, ओझर विमानतळ रस्ता लोकार्पण, पंचकेश्‍वर कॅनॉलवरील पुलाचे भूमिपुजन, समाज मंदिराचे लोकार्पण आमदार कोल्हेंच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विविध संस्थांचे आजी-माजी प्रतिनिधी, संचालक उपस्थित होते.

आमदार कोल्हे म्हणाल्या, निळवंडे धरण जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी असून, त्याचे कालवे पूर्ण करून प्रभावीपणे सिंचन सुविधा, कोपरगाव शहरासाठी थेट बंद पाईपलाईन पाणीपुरवठा, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे प्रलंबित प्रश्‍न व मतदारसंघातील 89 गावांचा आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा आपल्याकडे तयार आहे. कोपरगाव मतदारसंघाला गेल्या पाच वर्षांत 321 कोटी रुपयांचा निधी देऊन अनेक कामे मार्गी लावली आहेत. तसेच व्यक्तीगत लाभाच्या योजनांसाठीही मोठा निधी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत 9 हजार 939 शेतकऱ्यांना 34 कोटी 60 लाख 8 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मागील दहा वर्षांत विकासाचा एक खडाही अनेकांना पहावयास मिळाला नाही आणि आता तिच मंडळी अपप्रचार करीत आहेत. जनतेने आपल्या हाती दिलेली सत्तासुत्रे कामातून सार्थ ठरविले आहे, असेही त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.