“हिंमत असेल तर माझं सरकार पाडून दाखवा…”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना आव्हान

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार लवकरच कोसळेल असा सूर भाजपाने लावला आहे. मात्र, यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात चांगलाच समाचार घेतला. “हिंमत असेल तर माझे सरकार पाडा” असे थेट आव्हानच त्यांनी भाजपाला दिले.

शिवसेनेच्या दसरा मेळावा निमित्त उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी “मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालोय तेव्हापासून माझे सरकार पाडण्याच्या विविध तारखांबाबत मी ऐकत आहे. मात्र, ते अद्यापही घडलेलं नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर पुढे जा आणि ते करुन दाखवा.”असे आव्हान त्यांनी दिले.

“देश महामारीच्या संकटातून जात असताना केंद्र सरकारची नजर बिगर भाजपा राज्यातील सरकारं पाडण्याकडे होती. भाजपाच्या सत्तेच्या या लोभामुळे देश सध्या अराजकतेच्या दिशेने चालला आहे. आपल्या या वृत्तीमुळे भाजपा सहकाऱ्यांना गमावत आहे. आता तर एनडीएही संपली आहे. ते मैत्रीची भाषा करतात आणि त्यानंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसतात. बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते नितिशकुमार यांनाही अशीच वागणूक देतील.” अशा शब्दांत दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपावर चहू बाजूंनी हल्लाबोल केला.

मंदिर खुली न केल्यावरुन मुख्यमंत्र्यांना भाजपाने टार्गेट केलं जात आहे. यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले. तुमचं हिंदुत्व थाळ्या-घंटा बडवणारं असेल पण शिवसेनेचं हिंदुत्व हे दहशतवाद्यांना बडवणार आहे, असं ते म्हणाले. कंगना राणावतचा मुद्दा, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या यावरून महाराष्ट्राची बदनामी करणारे या मातीशी बेईमानी करणारे असून तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या केल्यात. आता ते गिळा व ढेकर देऊन गप्प बसा, असे ठाकरी भाषेतील फटकारेही उद्धव यांनी लगावले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.