खांदा व पाठ दुखी असेल तर, पेनकिलर घेण्याआधी हे घरगुती उपाय करून पाहा

मला वाटतं, 1984 हे वर्ष सर्वांनाच फार वाईट गेले असावे. भारताला, जगाला मोठे धक्के खावे लागले. या काळात खांद्याच्या विकाराचे विशेषतः फ्रोजन शोल्डरचे रोगी खूपच आले. पहिला रुग्ण कोण हे नेमके आठवत नाही. पण, थोडा विचार करून ऋतू, रोगाचे स्वरूप, जखडलेल्या अवयवांचे कार्य, आपल्याजवळ असलेली साधने, रोग्याजवळ असू शकणारी सुविधा असा आढावा घेतला.

पोटात देण्याकरिता तीन औषधे, लेपाकरिता लेपगोळी, मसाजकरिता कोणतेही तेल, गरम पाणी, मीठ यांचा शेक व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्यायाम. हाताची-खांद्याची हालचाल अशी सर्वंकष औषधी योजना ठरवली. आनंदाची बाब म्हणजे त्या दीड दोन वर्षात या विकाराचा प्रत्येक रुग्ण बरा झाला.

हा विकार वर्षात बरा झालाच पाहिजे, नाही तर आयुष्यभर हा विकार तुमच्याबरोबर राहील असा सज्जड दम मी रुग्णाला देत असतो. तसेच रुग्णाचा हात वर करून, तो ओरडला तरी व्यायाम कसा आवश्‍यक आहे, हे सप्रयोग पटवून देतो. खांदा जखडणे किंवा फ्रोजन शोल्डर या विकारापुरता मर्यादित विचार या लेखात आहे. या विकारात खांद्यांची रचना, सूज, स्नायु त्यांचे शरीर व कार्य यांचा नीट विचार केला तर कोणीही डॉक्‍टर वैद्यांनाच काय पण सामान्य माणसाला सुद्धा या विकारावरचे तातडीचे उपचार लगेच सुचतील.कळते ते वळत नाही, असा थोडासा भाग विकारात आहे. आपण हालचाल केली, शेकले, चोळले तर बरे वाटते हे रुग्णास कळत असते. पण, ते आमच्यासारख्यांनीच कडक शब्दात सांगावयाची रुग्ण वाट पाहत असतात.

शरीर व परीक्षण :
खांदा व पाठ यामध्ये नेमकी सूज कोठे आहे व केवढी आहे, हे पाहावे. हाताने दाबून दडसपणा, लेप लावण्याकरिता पाहणे आवश्‍यक आहे. थोड्या कष्टाने, श्रमाने, व्यायामाने, जास्तीत जास्त वर हात कुठपर्यंत जातो ते पाहावे.

लक्षणे
खांद्यामध्ये हात वर-खाली करावयास त्रास होणे.
खांदा, पाठ यामध्ये सूज येणे.
हाताला मुंग्या येणे.
खांद्याचा उखळीचा सांधा याने आपले काम नीट न करणे.

कारणे :
थंड, जड, गोड पदार्थांचा अतिरेकी वापर.
गारठा, ओल, गार वारे यामध्ये उघडे राहून काम करणे. पावसात भिजणे.
खांदा दुखण्याच्या सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष करणे.
ताकदीबाहेरचे अवघड ओझे उचलणे, बराच काळ ओझे वाहून नेणे.
रेल्वे बसमध्ये अवघडून बराच काळ प्रवास करणे.
झोपताना अंगाखाली हात सापडणे; पुरेशी काळजी न घेणे.
खूप मोठी ऊशी घेणे, गादी गार पडणे.
ँ दक्षता :
कटाक्षाने व्यायाम नियमितपणे करणे आवश्‍यक आहे. गरम पाण्यांत मीठ टाकून त्या पाण्याचा शेक खांद्याला देणे, ही दुसरी आवश्‍यक बाब आहे. खांद्याचा भाग सतत उबदार राहणे, ही तिसरी आवश्‍यक बाब आहे.

खास उपाय :
खांद्याला, पाठीला, दंडाला योग्य तऱ्हेने तेल जिरवणे, मसाज करून घ्यावा.
त्यानंतर खांदा, दंड, पाठ याला नेमका शेक मिळेल याकरिता पेटिकास्वेद, पिंडस्वेद किंवा स्थानिक स्वेद, निर्गुडीपाला, एरंडपाने, वडाची पाने यांच्या साहाय्याने करावा.
कणिक, डोगतेल यांचे गरमागरम पोटीस खांद्याच्या संबंधित भागाला एक वेळ लावून पाहावे.
बाजारात विविध दोषघ्नलेप गोळ्या मिळतात. त्यांचा दाट व सोसवेल असा गरम लेप जखडलेल्या भागाला लावल्यास खांदा निश्‍चयाने मोकळा होतो.
तीव्र मलावरोध असल्यास पोळ्या किंवा चपाती करताना, एका पोळीच्या कणेकला एक चमचा एरंडेल तेल या हिशोबाने मोहन म्हणून वापरावे.
किंवा दोन्ही जेवणानंतर एरंडेल तेलावर परतलेली सुंठ अर्धा चमचा या हिशेबात घ्यावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.