फळांचे रस पिताय तर, ‘ही’ बातमी नक्की पाहा…

रक्‍तातील हिमोग्लोबीन वाढवणारे डाळिंब हे मूळचे पर्शिया आणि अफगणिस्तान मधील. डाळिंब हे ग्रीष्म तूत होणारे फळ आहे.

गुणधर्म ः डाळिंबांमध्ये गोड, आंबटगोड, तुरट असे तीन प्रकार आढळतात. गोड असणारी डाळिंबे सर्वांत उत्तम प्रतीची असतात. डाळिंबाचा रस पचण्यास पचनसुलभ असतो. या रसामुळे हृदयविकार दूर होतो. गोड डाळिंब मधुर, तुरट, पचण्यास हलके, थंड, स्निग्ध, बुद्धिवर्धक, शक्‍तिवर्धक, आणि संतोषदायक असते. ते त्रिदोषहारक असून तृषा, दाह, ज्वर, हृदयरोग, मुखरोग आणि कंठरोगामध्ये गुणकारी आहे. तसेच ते संग्रहणीमध्ये फायदेशीर असून ते रक्‍तवर्धक व शक्‍तिवर्धक आहे. म्हणून हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी, अशक्‍त व दुर्बल व्यक्‍तिंनी डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन करावे.

घटक ः पाणी78 टक्‍के,
प्रोटिन 1.7 टक्‍के,
चरबी0.1 टक्‍के,
कार्बोदित पदाथ 14.5 टक्‍के,
कॅल्शियम 0.01 टक्‍के,
फॉस्फरस 0.07 टक्‍के,
लोह 100 ग्रॅम,
जीवनसत्त्व “बी’100 ग्रॅम,
जीवनसत्त्व “सी’ 100 ग्रॅम.

औषधी उपयोग ः डाळिंबामध्ये असणारी साखर साधारणतः पूर्वपाचित असते. एकूण साखरेपैकी सुमारे 0.15 टक्‍के साखर सुक्रोजच्या स्वरूपात असते. डाळिंबाच्या रसाने हृदय सुदृढ बनते. तसेच हृदयविकार दूर होतो. पोटात होणारी आग या रसाच्या सेवनाने शांत होते. घशाचे व तोंडाचे रोग या रसाने बरे होतात. या रसाने भूक चांगली लागते. पांडुरोगामध्ये तो गुणकारी आहे. अतिसार, मुरडा, संग्रहणी आणि खोकल्यामध्ये तो फायदेशीर आहे.

डाळिंब रस पचायला हलका असतो. सुती पातळ कापडात डाळिंबाचे दाणे घेऊन पिळून रस काढता येतो. गोड डाळिंबे औषधासाठी वापरतात. डाळिंब रस तापावर गुणकारी आहे. डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने पचनसंस्था कार्यक्षम बनून चरबी वाढत नाही व शरीराला पोषक द्रव्ये मिळतात.

त्वचा विकारावर पपईचा रस

पपई मूळची मेक्‍सिको आणि वेस्ट इंडिजच्या प्रदेशातील. पपई हे स्वस्त आणि सहजतेने प्राप्त होणारे फळ आहे. फेब्रुवारी-मार्च तसेच मे ते ऑक्‍टोबर या दरम्यान पपईचा मोसम असतो. हे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचे असते व पिकल्यानंतर ते पिवळ्या रंगाचे होते. पिकलेल्या पपईमधून मिऱ्याच्या आकाराच्या काळ्या व कडू बिया निघतात. पपईच्या रसामध्ये असलेला “पेपेन’ नावाचा घटक अन्न पचविण्यासाठी अत्यंत उपयुक्‍त ठरतो.

गुणधर्म ः यकृत आणि पाणथरीमध्ये पपई अत्यंत गुणकारी आहे. पपईच्या सेवनाने लघवी साफ होते, पोटही साफ राहते. पिकलेली पपई मधुर, जड, उष्ण, स्निग्ध, सारक, पित्तनाशक, वीर्यवर्धक, हृदय आणि उन्मादनाशक आहे.

घटक ः पाणी 81.6 टक्‍के,
प्रोटिन 0.5 टक्‍के,
चरबी 0.1 टक्‍के,
कार्बोदित पदार्थ 9.5 टक्‍के,
क्षार 0.4 टक्‍के,
कॅल्शियम 0.01 टक्‍के,
फॉस्फरस 0.01 टक्‍के,
लोह0.4 मि. ग्रॅम,
जीवनसत्त्व “ए’ 100 ग्रॅम,
जीवनसत्त्व “सी’ 46 ते 126 मि. ग्रॅम. पपईमध्ये असणाऱ्या शर्करेपैकी अर्धी शर्करा ग्लुकोजच्या स्वरूपात व अर्धी फलशर्करेच्या स्वरूपात असते. पपईमध्ये जास्तीत जास्त “ए’ जीवनसत्त्व असते. पपई जसजशी पिकत जाईल तसतसे त्यातील “सी’ जीवनसत्त्व वाढते. कच्च्या पपईमध्ये “सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण 32 मि. ग्रॅम, कच्च्या पपईमध्ये 40 ते 72 मि. ग्रॅम, अर्धवट कच्च्या पपईमध्ये 53 ते 95 मि. ग्रॅम आणि पिकलेल्या पपईमध्ये ते 68 ते 136 मि. ग्रॅम इतके असते.

पपईमध्ये असणाऱ्या साखरेचे व “सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण मे ते ऑक्‍टोबर महिन्यांत सर्वांत अधिक असते. याचबरोबर यात “बी1′, “बी2′ आणि नियासिन देखील असते.

औषधी उपयोग ः कच्च्या पपईमध्ये पांढऱ्या रसात “पेपेन’ नावाचा पाचक रस भरपूर असतो. पोटातील पाचक रस पेप्सिनप्रमाणेच पेपेन हे परिणामकारक असते. पेपेन आहारातील प्रोटिन (प्रथिन) पचवण्यास मदत करते. कच्च्या पपईचा रस औषधी असतो. पिकलेल्या पपईचा मिल्कशेक किंवा रस हा अत्यंत तृप्तिदायी असतो. कच्च्या पपईच्या रस कृमींनाशक असतो. पपईच्या सेवनाने मासिक स्रावामध्ये नियमितपणा येतो. पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी पेपेनला मान्यता दिली आहे.

संग्रहणी, मंदाग्नी अजीर्ण व मलावरोधावर पपई अत्यंत गुणकारी आहे. पांडुरोग तसेच पाणथरी वाढली असता पपई खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये पेपेन शिवाय आर्जिनाइन जे वंध्यत्वाला अटकाव करते, कार्पेन जे हृदयाला उपयुक्‍त ठरते, तसेच फाइब्रिन असते जे रक्‍त गोठण्यासाठी जरूरी असते यात एन्झाइम्स देखील असतात.

पपई मूत्रगामी असल्याने मूत्रपिंडाच्या विकारांत ती फायदेशीर ठरते. पिकलेली पपई बद्धकोष्ठतेवर रामबाण औषध आहे; दमेकऱ्यांना पपई गुणकारी असते. कच्च्या पपईचा रस तोंडावर चोळल्यास तोंडावरील मुरमे व पुटकुळ्या नाहीशा होतात. चेहरा सतेज होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

पपई उष्ण असल्याने गर्भावस्थेत तिचा रस पिऊ नये. तसेच तापात व उष्णता वाढलेली असताना पपईरसाचे सेवन टाळावे.
पिकलेल्या पपईच्या बिया तृषाशामक व कृमीनाशक असतात. पपईच्या पानांचे पोटीस ज्ञानतंतूच्या दुखऱ्या भागावर बांधतात तसेच हत्तीरोगामध्ये देखील पपईचा रस उपयुक्‍त ठरतो. पपईच्या रससेवनाने चेहऱ्यावरची सूज कमी होते.

पपईचा रस वृद्धपणी उत्साह वाढवण्यास मदत करतो. पपईरस कायाकल्प करतो. 200 मि. लि. पपई रस रक्‍तशोधन करण्याचे काम करते. पपईचा 200 मि.लि. रस आणि काकडीचा 200 मि. लि. रस तासातासाने आलटून पालटून घेतल्यास तो आरोग्यदायी ठरतो. पपईमध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या एन्झाइम्समुळे ती कॅन्सरवर मात होते. विषबाधेमुळे आतड्यामध्ये असणारे सहजिवाणू नष्ट पावतात, अशा वेळी त्या जिवाणूंच्या पुनःवृद्धिसाठी पपईचा रस अत्यंत गुणकारी ठरतो.

पोट आणि आतड्यांच्या व्याधीवर बेलफळ

बेलफळ हे मूळचे भारतातीलच. ते आकाराने गोल व कवठाप्रमाणे दिसणारे फळ आहे. त्याचा बेलफळाच्या आतील गर चवीला गोड असतो. त्यात बिया पुष्कळ असतात. बेलफळ औषधी आहे.

गुणधर्म ः बेलफळ मधुर, पचायला हलके, उष्ण, पाचक, जुलाबावर गुणकारी व जंतुनाशक असते. ते उलट्या, पोटशूळ व अल्पमूत्रतेचा त्रास या व्याधींवर गुणकारी आहे. ते त्रिदोषनाशक म्हणजे वात, कफ व पित्तनाशक आहे. पचनाच्या तक्रारी, जुलाब व जीर्ण मुरडा यावर बेलफळाचा रस उपयुक्‍त ठरतो.

घटक ः अल्प प्रमाणात जीवनसत्त्व “बी1′,
जीवनसत्त्व “बी2′, नियासिन आणि जीवनसत्त्व “इ’
थोड्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस व लोह देखील आहे.
पाणी84 टक्‍के,
प्रोटिन0.7 टक्‍के,
चरबी0.7 टक्‍के,
कार्बोदित पदार्थ16.2 टक्‍के,
टॅनिन9 ते 20 टक्‍के,
जीवनसत्त्व “सी’ 76 मि. ग्रॅम,

औषधी उपयोग ः बेलफळाचा गर नुसता खाल्ला जातो अगर त्याचा रस काढून त्याचे रस सेवन करता येते. बेलफळ हे फळ पौष्टिक व रक्‍त शुद्ध करणारे आहे. रक्‍तदोषामध्ये 50 मि. ग्रॅम बेलफळाचा गर पाणी व साखरेबरोबर दिवसातून 2-3 वेळा घेतला असता अत्यंत फायदा होतो. बेलफळात असणाऱ्या टॅनिनमुळे त्यात औषधी गुण आहेत. पचनाच्या तक्रारी तसेच जीर्ण मुरड्यावर बेलफळाचा रस घ्यावा. बेलफळाचा रस पोट आणि आतड्यांच्या व्याधींवर, कॉलऱ्यामध्ये रामबाण औषध आहे. पिकलेल्या बेलफळाचा रस अतिसार झाला असता घ्यावा.

तोंडातील जंतूंचा नाश करतो सफरचंद रस

आजकाल सफरचंद हे बाराही महिने मिळणारे फळ आहे. सफरचंदांच्या अनेक जाती आहेत. काही लालसर तर काही गुलाबीसरही सफरचंद असतात. “रोज एक सफरचंद खा आणि डॉक्‍टराला दूर ठेवा.’ अशी ख्याती सफरचंदाची आहे.

गुणधर्म ः सफरचंद हे चवीला आंबटगोड, ग्राही, पौष्टिक, पथ्यकारक, तृषाशामक, पित्त व वायूनाशक, संग्रहणी व आमांश दूर करणारे आणि आतड्यांना सुदृढ करणारे आहे. सफरचंदामध्ये असणारा “पॅक्‍टिन’ नावाचा घटक शरीरातील साठून राहिलेल्या कफाला पातळ करतो. तसेच तो शरीरातील विषारी द्रव्ये नाहीशी करतो. पोटातील आम्लता कमी करतो. तसेच “पॅक्‍टिन’ मुळे हृदय, मेंदू, यकृत आणि जठर सुदृढ बनते. त्यामुळे भूकही चांगली लागते. रक्‍तातही वाढ होते.

घटक ः पाणी 85.9 टक्‍के,
प्रोटीन0.3 टक्‍के,
चरबी0.1 टक्‍के,
कार्बोदित पदार्थ 9.5 टक्‍के,
खनिज पदार्थ 0.4 टक्‍के,
कॅल्शियम 0.01 टक्‍के,
फॉस्फरस 0.02 टक्‍के,
लोह 0.7 मि. ग्रॅम.
जीवनसत्त्व “बी’ 100 ग्रॅम, थोड्या प्रमाणात “ए’ जीवनसत्त्व व तांब्याचे क्षार

औषधी उपयोग ः सफरचंद चावून खाल्ली किंवा त्याचा रस प्यायला तरी चालतो. परंतु त्यातील घटकतत्वे अधिक प्रमाणात मिळवायची असल्यास सफरचंदाचा रस सेवन करावा. लहान मुलांना जुलाब होत असतील तर त्यांना सफरचंदांचा रस द्यावा. सफरचंदामध्ये रेचक हा गुण असून त्यामध्ये असणाऱ्या “पॅक्‍टिन’ मुळे जुलाब थांबण्यास मदत होते.

सफरचंदामुळे पोटातील तसेच आतड्यातील निरूपयोगी जिवाणूंचा नाश होतो. कावीळ, मूत्रपिंड तसेच यकृताच्या आजारातही सफरचंदाचा रस घ्यावा. आम्लतेमुळे होणाऱ्या सांधेदुखीच्या विकारात देखील सफरचंद उपयोगी आहे. सफरचंदाचा ताजा रस मधाबरोबर घेतल्यास तो अधिक पौष्टिक ठरतो.

मेंदू व ज्ञानतंतुंची दुर्बलता, मूतखडा, पोटातील आम्लता, अजीर्ण, डोकेदुखी, पित्तप्रकोप, दमा, आणि संग्रहणीमध्ये सफरचंद गुणकारी आहे. सफरचंद चांगले चावून खाल्ले असता त्यामध्ये असणाऱ्या आम्लतेमुळे दातात तसेच तोंडात असणाऱ्या जंतूंचा नाश होतो. म्हणूनच दातदुखीवर सफरचंद खाणं किंवा त्याचा रस पिणं हे एक औषध आहे.

पचनशक्‍ती वाढवणारा संत्र्याचा रस

संत्र मूळचं दक्षिण चीनमधील. संत्र आंबट, गोड व रसाळ असते. ते शीतल असते. वर्षातून दोनदा संत्र्यांचा सीझन असतो. नागपूरमधील संत्री उत्कृष्ट प्रतीची मानली जातात. तिथे संत्र्यांचे मुबलक पीक होते. संत्र्याचा रस चयापचयाच्या क्रियेत शरीरात आम्लाचे अवशेष ठेवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्‍ती वाढते.

गुणधर्म ः संत्र आंबट, मधुर, क्षुधावर्धक, रक्‍तशोधक, पित्तशामक, वातनाशक, शीतल, स्निग्ध, रुचकर आणि मुखशुद्धीकारक असते. ती तापातदेखील हितकारक आहेत. संत्र्याच्या रसाच्या सेवनाने पोटातील कृमी आणि पोटशूळाचा विकार दूर होतो. हाडे मजबूत होतात.

घटक ः पाणी 87.8 टक्‍के
प्रोटीन 0.9 टक्‍के
चरबी 0.3 टक्‍के
कार्बोदित पदार्थ 10.6 टक्‍के
कॅल्शियम0.05 टक्‍के
फॉस्फरस 0.02 टक्‍के
लोह 0.1 मि. ग्रॅम
सोडियम2.1 मि. ग्रॅम
पोटॅशियम19.7 मि. ग्रॅम
मॅग्नेशियम12.9 मि. ग्रॅम
तांबे0.07 मि. ग्रॅम
सल्फर9.3 मि. ग्रॅम
क्‍लोरिन3.2 मि. ग्रॅम
जीवनसत्त्व ए350 मि. ग्रॅम
जीवनसत्त्व बी1 120 मि. ग्रॅम
जीवनसत्त्व सी68 मि. ग्रॅम

संत्र्याच्या रसात जीवनसत्त्व सी पुष्कळ प्रमाणात असते. 124 ते 150 मि. लि. संत्र्याचा रस घेतला असता सी जीवनसत्त्वची संपूर्ण दिवसाची गरज भागते. संत्र्यामध्ये असलेले सी जीवनसत्त्व सायट्रिक ऍसिडमुळे सुरक्षित असल्याने ते लवकर नष्ट होत नाही. याशिवाय संत्र्यामध्ये सी जीवनसत्त्व व कॅल्शियम संयुक्‍त स्वरूपात असल्याने दोन्ही एकमेकांच्या गुणांची वाढ करण्यास पोषक ठरतात. संत्र्याच्या फोडीवरील सफेद पातळ आवरणात कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असते. संत्र्याच्या रसात तेजाबचे प्रमाण कमी असते. त्यातील सायट्रिक ऍसिड क्षारधर्मी आहे.

औषधी उपयोग ः संत्रे चावून खाल्लेले चांगले असले तरी संत्र्याचा रस अधिक हितकारक असतो. सर्द प्रकृती असलेल्यांनी संत्र्याच्या रसात थोडे गरम पाणी मिसळून मग ते प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी आणि पहाटे एक-दोन संत्री चावून खाल्ल्याने बद्धकोष्ठता नाहीशी होते. दमा आणि श्‍वासनलिकेच्या सुजेवर संत्र्याचा रस गुणकारी असतो. तापामध्ये संत्र्याच्या रसाने रोग्याला शक्‍ती मिळते.

त्यामुळे पचनशक्‍ती सुधारते आणि भूक वाढते. संत्र्याच्या रसाच्या सेवनाने पचनसंस्थेमधील निरुपयोगी जंतूचा नाश होतो आणि आंतडी सुदृढ बनतात. संत्र्याच्या रसामुळे जीवनशक्‍तीत वाढ होते. गर्भवतीला उलट्यांचा त्रास होत असेल तर आराम वाटण्यासाठी संत्र्याचा रस प्यावा. संत्र्याच्या एक कप रसातून जवळजवळ पाऊण कप दुधाइतकी उष्णता शरीराला प्राप्त होते. अन्न पचन नीट झाले नाही तर अन्न कुजण्याची प्रक्रिया घडते. त्यामुळे गॅस निर्माण होऊन जठर आणि लहान आतड्यात बिघाड होतो. अशा वेळी संत्रा रस घेतला तर तो जठर आणि आतड्याचा मार्ग स्वच्छ करतो. त्यामुळे या दोन्ही अवयवांची पचनशक्‍ती सुधारते.

– सुजाता टिकेकर (लेखिका आयुर्वेद आणि फिटनेसमधील तज्ज्ञ आहेत.)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.