विम्याची रक्कम न दिल्यास बॅंकांवर कारवाई करा : माने

टंचाई व खरीप आढावा बैठक; आवर्तन सोडलेल्या भागातील टॅंकरचा आढावा द्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला खरीप हंगाम पूर्ण नियोजनाचा आढावा

नगर – शेतकऱ्यांना बॅंकेने पीकविम्याची रक्‍कम देण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्‍त राजाराम माने यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा व सन 2019-20 नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माने यांनी जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

माने म्हणाले, शेतकऱ्याला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई आहे. त्यामुळे खरिपाचे नियोजन करताना त्याला काय आवश्‍यक आहे, याचे नियोजन करण्याची गरज आहे. मागील काळाचा विचार करता औषध कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहे. हे लक्षात घेऊन सर्व औषध कंपन्यांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. कापूस पीक हे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक ती दक्षता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

द्विवेदी म्हणाले, जिल्ह्यातील जलयुक्‍तसाठी 249 गावांची निवड झाली. प्रस्तावित कामांची संख्या 6 हजार 368 पैकी 2 हजार 404 कामे पूर्ण झालेली असून उर्वरित 3 हजार 964 जलयुक्तची कामे प्रगतीत आहेत. या कामांचे सर्व संबंधित ठेकेदारांना कार्यारंभाचे आदेश दिलेली आहेत. सर्व कामे लवकर पूर्ण करण्यात यावीत. माहे मे 2019 च्या शेवटच्या आठवडयात जलयुक्‍त कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे यावेळी सांगितले.

नलगे म्हणाले, जिल्ह्यामध्ये 1 हजार 602 गावे आहेत. यापैकी खरीप हंगामाची 582 गावे तर रब्बी हंगामाची 1 हजार 20 गावे आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगालिक क्षेत्र 17.02 लाख हेक्‍टर आहे. खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 4.79 लाख आहेत. खरीप हंगामासाठी 6.65 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते सरासरीच्या क्षेत्राच्या 125.70 टके इतके आहे. प्रामुख्याने 2.29 लाख हेक्‍टर क्षेत्रावर तृणधान्य 1.01 लाख हेक्‍टर क्षेत्रावर कडधान्य, 0.95 लाख हेक्‍टर क्षेत्रावर गळीत धान्य पिकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर कापूस पिकाचे 1.30 लाख हेक्‍टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

टंचाई आढावा बैठकीत माने म्हणाले, भंडारदरा, मुळा व कुकडी धरणातून शेती व पिण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे.आवर्तन सोडल्यानंतर आवर्तनाच्या भागातील किती पाण्याचे टॅंकर कमी झाले याचाही आढावा घ्यावा. ज्याठिकाणी प्राधान्याने पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे, ते त्या कारणासाठीच वापरले जात आहे, याची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी म्हणाले, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर मंजूर करताना ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते, त्या भागातील टॅंकर कमी करण्यात यावे. तसेच टॅंकर मंजूर करताना लोकसंख्या विचारात घेऊनच टॅंकरला मंजूरी देण्यात यावी. जिल्ह्यातील चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांची स्थानिकपातळीवर तपासणी करण्यात यावी. चारा छावणीचे देयके जास्त कालावधीसाठी प्रलंबित ठेवण्यात येऊ नये. चारा छावणीतील शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार सुविधा दिल्या जावेत तसेच चारा छावणीतील जनावरांच्या टैगिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, भुजलपातळी, पाणीसाठा याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात नागरी भागात 59 व ग्रामीण भागात 694 टॅंकर चालू आहेत. जिल्ह्यात 503 छावण्या मंजूर करण्यात आल्या असून 472 छावणी कार्यरत आहेत. या छावणीमध्ये लहान 40 हजार 464 व मोठे 2 लाख 55 हजार 497 असे एकूण 2 लाख 95 हजार 961 जनावरे दाखल आहेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 868 कामावर 7 हजार 454 मजूर काम करीत असल्याची माहिती यावेळी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.