हिम्मत असेल तर विमानतळाला विरोध जाहीर करा

राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे विरोधकांना आव्हान

पुणे – एकीकडे विमानतळ प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र, विमानतळ दुसऱ्या जागेत करायचे अशी दुहेरी भूमिका घेवून नागरिकांना संभ्रमात टाकायचे, त्यापेक्षा तुमच्या हिम्मत असेल तर विमानतळ प्रकल्प नको असे जाहीर करा, असे खुले आव्हान महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा जपसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करून नाही तर त्यांना न्याय देवूनच करणार असल्याचे शिवतारे यांनी नमूद केले.

विजय शिवतारे यांनी शक्‍ती प्रदर्शन करीत पुरंदर विधानसभा मतदानसंघातून गुरुवारी (दि. 3) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सासवडमधील हुंडेकरी चौकात झालेल्या मेळाव्यात विजय शिवतारे यांनी संजय जगताप आणि अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला.

याप्रसंगी हातकाणंगलेचे शिवसेनेचे खासदार धर्याशील माने, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप यादव, पंचायत समिती सभापती रमेश जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के, हवेलीचे शंकर नाना हरपळे, संदीप धाडशी, अभिजित जगताप, छाया सुभागडे, दत्तात्रय काळे, संगीता ठोसर, मंदार गिरमे, अजित काका जाधव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नामदेव नेटके, पंकज धिवार, शालिनी पवार, ज्योती झेंडे, राजीव भाडळे, नलिनी लोळे, सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, डॉ. राजेश दळवी त्याच प्रमाणे इतर पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले की, थोड्याच दिवसांत तालुक्‍यात गुंजवणी धरणाचे पाणी येणार आहे. परंतु, हे पाणी आणतांना विरोधक कायम अडथळा आणत होते; मात्र आता उच्च न्यायालयानेही त्यांचा दावा अक्षरशः फेटाळून लावला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुंजवणी धरणाचे पाणी येणारच, कोणीही आता पाणी रोखू शकणार नाही. अशा तीव्र शब्दात विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल केला.

भाजपचे नेते अनुपस्थित
शिवतारे यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सहकारी पक्ष भाजपवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुरंदरमधील भाजपच्या नेत्यांनी उमेदवारी दाखल करण्यास कोणीही जायचे नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे या उमेदवारी दाखल करण्यास भाजपचा तालुक्‍यातील एकही नेता अथवा कार्यकर्ता उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मनसेतून भाजपमध्ये गेलेले बाबाराजे जाधवराव, राष्ट्रवादीतून गेलेले जालिंदर कामठे, यांच्यासह भाजपचे सरचिटणीस आर. एन. जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य गिरीश जगताप, तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांच्यासह एकही नेता अथवा कार्यकर्ता फिरकला नाही, त्यामुळे याचीच जोरदार चर्चा होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)