वेल्हे (प्रतिनिधी)- पुणेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वेल्हे तालुक्याला बाहेरून नव्याने येणाऱ्या व्यक्तीपासून करोना संपर्काचा जास्त धोका आहे. तालुक्यात एकूण १८ रूग्ण आहेत तर या आधी पानशेत परिसरासह ८ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. या सर्वांचा इतिहास पाहीला तर त्यांचा रेड झोन असलेल्या पुण्याशी संपर्क आला आहे.
वेल्हे तालुक्याला पुणे जवळ असल्याने नोकरी निमित्त व इतर कामांसाठी तालुक्यातील नागरिक सातत्याने ये जा करत आहेत. लॉकडाऊन शिथील झाले आहे.तसेच आपल्या गावी जाण्यासाठी परवाणगी मिळत असल्याने वेल्हे तालुक्यात पुणे मुंबईवरून येणारा नागरिकांचा लोंढा वाढत आहे. यामुळे करोना मोठ्याप्रमाणावर हात पाय पसरू शकतो.
यासाठी वेल्हे प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात येत आहेत.वेल्हेचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी बाहेरून तालुक्यात येणाऱ्यांना गावात जाऊ न देता नेमून दिलेल्या ठिकाणी इन्स्टीट्युशनल क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील चार मंडल विभागाच्या ठिकाणी इन्स्टीट्युशनल क्वारंटाइनची चार ठिकाणे नेमली आहेत. त्यामुळे आता पुणे-मुंबईवरून येणाऱ्यांना आपल्या गावात जाता येणार नाही तर थेट इन्स्टीट्युशनल क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. क्वारंटाइन होणाऱ्यांच्या आरोग्यावर १४ दिवस विषेश लक्ष दिले जाणार असून त्यांच्या आरोग्याची दिवसातून दोनदा तपासणी केली जाणार आहे.क्वारंटाइन लोकांच्या जेवणाची व इतर सर्व सोयी क्वारंटाइन झालेल्या ठिकाणीच मिळणार आहे.
इन्स्टीट्युशनल क्वारंटाइन ठिकाणे-
१) मंडल अंबवणे येथील सरस्वती विद्यालय अंबवणे
२)मंडल वेल्हे येथील लक्ष्मी मंगल गार्डन कार्यालय, कोंढावळे बुद्रूक
३)मंडल विंझर येथील न्यू इंग्लिश स्कुल विंझर
४)मंडल पानशेत येथील वीर बाजी पासलकर हायस्कुल पानशेत