पिंपरी – पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये महापौर शिवसेनेचा करायचा आहे. त्यासाठी ताकदीने निवडणुकीमध्ये उतरा, आघाडी होईल की नाही याची चिंता तुम्ही करू नका. आपल्या एकट्याने लढायची सवय आहे. सगळ्या जागेवर शिवसेना लढेल. आलात तर तुमच्यासोबत अन्यथा तुमच्याशिवाय लढू, असा इशारा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देत महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना रविवारी (दि. 26) दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “कार्यकर्ता मार्गदर्शक मेळावा’ घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, उपनेता गोविंद घोळवे तसेच नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण सर्व जागेवर तयारी केली पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर आमच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधील इतर पक्षांचे नेचे चर्चेला बसतील. आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. मात्र सन्मानाने आघाडी झाली तरच एकत्र लढू. अन्यथा शिवसेना पालिकेत स्वबळावर लढेल. स्वाभिमान सोडून शिवसेना भगव्या झेंड्याशी तडजोड करणार नाही. पालिका निवडणुकीत मुंसडी मारण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचा फायदा नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड भाग हा संमिश्र भाग आहे. अनेक राज्यांमधून याठिकाणी लोक वास्तव्यास आले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे काम शिवसैनिकाने केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. आता आपल्या शहरामध्ये महापौर देखील शिवसेनेचा झाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही जिद्दीने लढा असा सल्ला यावेळी राऊत यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेनेत नवीन चेहरे दिसले पाहिजेत
राऊत यांनी सभागृहामध्ये असलेल्या कमी गर्दीवरून शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांना सुनावले. राऊत म्हणाले, निवडणुकीमध्ये जर का चांगले यश मिळवायचे असेल तर ही समोरील गर्दी वाढणे आवश्यक आहे. मी नेहमी येतो, मला तेच ते चेहरे दिसतात. भविष्यात नवीन चेहरे शिवसेनेत दिसले पाहिजे. तरच आपण महापालिका निवडणुकीत यश संपादन करू शकू. व्यासपीठावर गर्दी वाढते, मात्र सभागृहात समोर गर्दी दिसत नाही. गतवेळच्या अपयशाबाबत बोलताना राऊत म्हणाले, महापालिका निवडणुक आली की आपल्या फुग्यातील हवा जाते. मात्र आता घासून नाही तर ठासून पिंपरी पालिकेत सत्ता आणायचीच या जिद्दीने कामाला लागा.