खासगी रुग्णालयांना करोनासंदर्भात तंबी
कोलंबिया एशिया हॉस्पिटलला जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
पुणे – खासगी रुग्णालयांनी करोना बाधित रुग्णांना जादा दराने बिल आकारू नये. तसे आढळल्यास संबंधित रुग्णालयावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. दरम्यान, जादा बिल आकारल्या प्रकरणी शहरातील कोलंबिया एशिया हॉस्पिटलला नोटीस बजावल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
करोना बाधितांना तात्काळ उपचार देण्यासाठी पुणे महानगरपालिका रुग्णालय आणि ससून रुग्णालयासह खासगी रुग्णालये जीव ओतून सेवा देत आहेत. मात्र, काही खासगी रुग्णालये बाधितांवर उपचार करून जादा बिल आकारात असल्याच्या काही तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यामध्ये कोलंबिया हॉस्पिटलने जादा बिल आकारल्याचे समोर आल्यामुळे त्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात आली आहे.
अशा काही मोजक्याच रुग्णालयांच्या कारभारामुळे अन्य खासगी रुग्णालयांची प्रतिमा ढासळत आहे. तर, नागरिकांमध्येही नकारात्मक संदेश जात आहे. दरम्यान, याबाबत कोलंबिया एशिया हॉस्पिटलने खुलासा करत, “संबंधित रुग्णाला बिलाची कल्पना दिली होती. 15 दिवसांचे हे बिल असून, त्यांना स्वतंत्र कोविड विभागात ठेवले होते. त्याप्रमाणेच हे बिल दिल्याचे हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. विजू राजन यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांनी या नियमाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
करोना उपचारांनंतर रुग्णाला डिस्चार्ज देताना, सर्वसामान्य बिल आकारावे. रुग्णालयाने दिलेल्या बिलांची आम्ही प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत. त्यामध्ये बिल कसे आकारले, याची माहिती घेतली जाईल. त्यामध्ये अधिकचा दर लावला असेल तर त्या रुग्णालयाला नोटीस बजावण्यात येईल.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी पुणे