विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांचा इशारा
पिंपरी – विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या शोभायात्रेत मुलींच्या हातातील बंदुका या प्रतिकात्मक होत्या. त्यामुळे आर्म ऍक्ट लागू होत नाही. तसेच पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुढील आठवड्यात मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढू असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद इनामदार, ऍड. मृणालीनी पडवळ, मिलींद देशपांडे, ऍड. सतिश गोरडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले, पोलिसांच्या सूचनेनुसार विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीकडून युवतीच्या शारिरिक, मानसिक आणि बौध्दिक विकासासाठी देशभरात सात दिवसांचे शिबीर घेण्यात येते. पिंपरी-चिंचवड शहातही अशाच प्रकारे शिबीर घेण्यात आले होते.
या शिबिरानंतर शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत दुर्गा मातेचे प्रतिक म्हणून खोटी तलवार युवतीच्या हातात होती. या शोभायात्रेसाठी पोलिसांची परवानगी देखील घेण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी बंदोबस्तास उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतेही सहकार्य न करता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली. व सूडबुध्दीने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला.