‘बसबद्दल पुन्हा विचाराल, तर दांडक्‍याने मारेन’; कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा

प्रवासी तीन तास ताटकळले

पुणे – वारीनिमित्त देहू आणि आळंदीसाठी जादा बसेस पीएमपीने सोडल्या आहेत. मात्र, त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यावर पर्यायी व्यवस्था करणे अथवा त्यांना सौजन्याने उत्तर देण्याऐवजी पीएमपीच्या चौकशी कक्षातील कर्मचाऱ्यांनी दांडक्‍याची भाषा वापरल्याचा अनुभव प्रस्तुत प्रतिनिधीस सोमवारी आला.

कोरेगाव पार्क आणि घोरपडी मार्गे केशवनगर, जहांगीर हॉस्पिटलमार्गे हडपसर आणि चिखली येथे जाणाऱ्या बससाठी जवळपास तीन तास प्रवाशांना बसथांब्यांवर ताटकळत उभे राहावे लागले. “बस कधी येणार’ अशी विचारणा पीएमपीच्या कर्मचाऱ्यांकडे केली असता, प्रवाशांना केवळ अरेरावी आणि उद्धटपणे उत्तरे ऐकावी लागली.

संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून या मार्गांवर जादा बसेस सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या अरेरावीबाबत चौकशी करण्यात येणार असून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
– नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

बंद पडणाऱ्या बसेसची भर
“पावसाळ्याच्या सुरूवातीला ही परिस्थिती आहे, अजून तर पावसाळा बाकी आहे. त्यावेळी काय करायचे’, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पाऊस त्यात बंद पडलेल्या बसेस आणि वाहतूक कोंडी असे समीकरण नागरिकांना अनुभवायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.