‘या’ शापित ठिकाणी फिरायला जाणार असाल तर…सावधान !

वैविध्याने नटलेल्या आपल्या भारत देशात विविध सुंदर पर्यटनस्थळ आहेत, जिथे जगभरातील पर्यटक भेट देतात. मात्र, काही अशी ठिकाणेही आहेत, जिथे जाणे कदाचित पर्यटकांना महागात पडू शकते. कारण ही ठिकाणे चक्क ‘शापित’ मानली जातात. 

अर्थात, ऐकीव माहिती किंवा स्थानिकांच्या अंधश्रध्दांमुळे ही ठिकाणे रहस्यमय असली तरी पर्यटकांना आकर्षित करणारी ठरू शकतील. भारतातील अशा भयानक ठिकाणांचे गूढ कायम आहे. त्यामुळे इथे जाण्याचे ठरवत असाल तर ही माहिती वाचणे खूप रंजक आणि उपयुक्त ठरेल!

(1) भानगढ किल्ला, अलवर, राजस्थान.

राजस्थानातील अलवर जिल्ह्यात स्थित आहे भानगढचा किल्ला. या किल्ल्याला काही लोक प्रेत बाधित तर काहीजण तांत्रिकाने दिलेला शाप मानतात. कारण काहीही असो, परंतु हा किल्ला आजही एक गूढ आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या किल्ल्यात रात्री प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. या किल्ल्यासंदर्भातील इतिहास सांगायचा झाला तर, एक जादुगार या किल्ल्याच्या राजकुमारीच्या सुंदरतेवर भाळलेला. राजकुमारीला मिळवण्यासाठी त्याने काळ्या जादूचा मार्ग निवडला. मात्र त्याची ही काळी जादू त्याच्यावरच उलटली आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी या जादूगरने राजघराण्याला शाप दिला. तो म्हणाला, राजघराण्यातील सर्व लोक लवकरच मरतील आणि त्या सर्वांचा आत्मा गडावर भटकत राहिल. अजुनही त्यांचा आत्मा भटकतो असे तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. यामागे नेमकं काय कारण हे कोणालाही माहिती नाही, परंतु रात्रीच्या वेळी येथे जाणे धोक्यापेक्षा कमी नाही.

(2) जट‌िंगा व्हॅली, आसाम.

येथे मृत्युच्या छायेत अडकून आकाशाला गवसणी घालणारे पक्षी स्वतः मृत्यूला कवटाळतात म्हणजेच आत्महत्या करतात. तुम्हाला हे वाचून थोडेसे विचित्र वाटले असेल की, पक्षी आत्महत्या कशी काय करू शकतात. परंतु ही गोष्ट केवळ तुम्हालाच चकित करणारी नसून येथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक गूढ बनली आहे. ही घटना भारतात घडते. भारताचे उत्तर पूर्व राज्य आसाममध्ये एक घाटी आहे. या घाटीला जट‌िंगा व्हॅली म्हणतात. येथे गेल्यानंतर तुम्हाला पक्षी आत्महत्या करणारे दृश्य दिसेल. मान्सून काळात ही घटना जास्त प्रमाणात घडते. या व्यतिरिक्त अमावास्येच्या रात्री पक्षी आत्महत्या करण्याच्या घटना जास्त पाहावयास मिळतात. येथील स्थानिक हे काम भूतप्रेत आणि अदृश शक्तींचे असल्याचे मानतात. याउलट वैज्ञानिक दृष्टीकोनातून धारणा अशी आहे की, जोराच्या हवेमुळे पक्षांचे संतुलन बिघडते आणि ते जवळपासच्या झाडांना धडकून जखमी होतात किंवा मरतात. या घटनेमागे सत्य काहीही असले तरी, हे ठिकाण पक्षांच्या आत्महत्येसाठी जगभरात एक रहस्य बनले आहे.

(3) हरंगुळ, लातूर.

महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यात हरंगुळ गाव आहे. येथे 15 व्या शतकापासून काळ्या जादूने हडळ बनवण्याची प्रथा सुरु झाली. आजही हे गाव हडळेच्या सावटाखाली आहे. आजही येथे रात्रीच्या वेळी अनेक कार्य करण्यास मनाई आहे. येथील कोणताच व्यक्ती रात्रीच्या वेळी झाडाच्या जवळपास झोपत नाही. झाडामध्ये खिळा ठोकणे आणि मुत्र विसर्जन करणे वर्ज्य आहे. असे केल्यास हडळ त्या व्यक्तीची वाईट अवस्था करते असे मानले जाते.

(4) कुर्सीयांग, दार्जिलिंग.

दार्जलिंग येथील एक हिल स्टेशन कुर्सियांग. इंग्लिशमध्ये ‘कर्स’ चा अर्थ शाप असा होतो. या शब्दावरूनच या ठिकाणाचे नाव कुर्सियांग म्हणजे शापित ठिकाण असे पडले आहे. या गोष्टीचे सत्य येथे आल्यानंतरच समजते. स्थानिक मान्यतेनुसार येथील जंगलात शीर (डोके) नसलेला एक व्यक्ती फिरतो. रात्रीच्या वेळी डाउ हिल जंगलात जाणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे मानले जाते. डाउ ह‌िल व्यतिरिक्त येथील इतर ठिकाणही हॉंटेड मानले जातात. यामुळे येथे फिरायला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका.

(5) निधीवन, मथुरा.

मथुरेतील निधीवन या ठिकाणी स्थानिक मान्यतेनुसार आजही भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा गवळणींसोबत रासक्रीडा करतात. यामुळे रात्र झाल्यानंतर या वनाचे दरवाजे बंद केले जातात. पशु-पक्षीसुद्धा वनातून निघून जातात. असे मानले जाते की, या ठिकाणी रात्री थांबणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा तो वेडा होतो.

(6) किराडू मंदिर, बारमेर, राजस्थान. 

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात स्थित असलेल्या किराडू मंदिराला राजस्थानचे खजुराहोसुद्धा मानले जाते. हे मंदिर शापित असल्याचे सांगितले जाते. एका साधूने दिलेल्या शापामुळे रात्र झाल्यानंतर या मंदिरात कोणीही थांबत नाही. येथे रात्री थांबणारा व्यक्ती दगड बनतो किंवा त्याचा मृत्यू होतो असे मानले जाते.

(7) कुलधारा, जैसलमेर, राजस्थान. 

जैसलमेरपासून 18 किलोमीटर अंतरावर वसलेले कुलधारा गाव शापित आहे. हे गाव 1825 पासून उजाड आहे. असे सांगितले जाते की, पालीवाल ब्राह्मणांनी या गावाला पुन्हा येथे कधीही वस्ती दिसणार नाही असा शाप दिला आहे. तेव्हापासून हे गाव उजाड आहे. जवळपास राहणारे स्थानिक सांगतात की, या गावामध्ये रात्री भूत-पिशाचांचे आणि इतर विचित्र आवाज ऐकू येतात. यामुळे या गावात रात्री कोणीही जात नाही.

(8) वीर खंडेराव किल्ला, पोहरी, मध्यप्रदेश.

मध्यप्रदेशातील पोहरी गावात 2100 वर्षांपूर्वीचा वीर खंडेराव यांचा एक किल्ला आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या किल्ल्यातून रात्री घुंगरांचा आवाज येतो. असे सांगितले जाते की, रात्रीच्या वेळी किल्ल्यात खंडेरावांची सभा भरते आणि यामध्ये नर्तकींचे नृत्य होते. यामुळे रात्र झाल्यानंतर लोक या किल्ल्याजवळ येत नाहीत.

(9) रुपकुंड, उत्तराखंड.

उत्तराखंडमधील रूपकुंड येथे तुम्हाला सर्वठिकाणी नर कंकाळ दिसतील. येथे रात्रीच नाही तर दिवसासुद्धा जाण्याचे कोणाचेही धाडस होत नाही.

(10) दमस बीच, गुजरात.

गुजरातमधील प्रसिद्ध ठिकाण म्हणून या बीचला ओळखले जाते. इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र येथील स्थानिक लोकांच्या गोष्टी ऐकूण लोकांची तब्येत बिघडते. स्थानिक नागरिकांचे म्हणणे असे आहे की, सुर्यास्ताच्या वेळी या बीचवर गेल्यास किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात.

(11) शनिवार वाडा, पुणे.

पुण्यातील शनिवार वाडा या वास्तूकडे एक ऐतिहासिक वास्तू म्हणून पाहिले जाते. या वास्तूचे जितकी सुंदरता पाहायला मिळते तितकीच ती भयानक असल्याचे मानले जाते. या वास्तूमध्ये ‘काका मला वाचवा’ असा लहान नारायण पेशव्यांचा आवाज ऐकू येतो, अशी वदंता आहे.

(12) जी.पी ब्लॉक, मेरठ. 

मेरठमधील ही इमारत खूप भयानक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या इमारतीमध्ये लाल रंगाची साडी नेसुन एक महिला सतत वावरत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. कधी इमारतीच्या वर तर कधी इमारतीच्या बाहेर ती वावरत असते. त्यामुळे इथे लोकांनी जाण्याचे बंद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.