‘आम्ही बोललो तर महागात पडेल’

चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांना सज्जड इशारा

पुणे – मागील 5 वर्षांत सरकारने केलेल्या विकासकामातून जनतेला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाहीत. त्यामुळे प्रचारात खालच्या थराला जावून बोलले जात आहे. “आम्ही बोललो तर महागात पडेल,’ अशा शद्बात भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना सज्जड दम देत, बोलायचे तर विकास आणि धोरणांवर बोला, असा सल्लाही दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शहराध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, अमर साबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे, उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, कुलदीप कोंडे, मुरलीधर मोहोळ, उज्वल केसकर उपस्थित होते.

राज ठाकरे हे चांगले व्यक्‍तीमत्व आहेत. मात्र, शरद पवारांनी लिहून दिलेली वाक्‍य बोलत आहे. एकीकडे अजित पवार मला “चंपा’ म्हणाले, की राज ठाकरे ही चंपा म्हणतात. तुम्हाला स्वत:चे मत आहे की नाही, अशा कानपिचक्‍या घेत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुणे शहर झपाट्याने वाढले. परंतु, सोयी-सुविधा पुरेशा मिळाल्या नसून, पुढील 5 वर्षांत शहराच्या विकासाला आणखीन गती मिळेल, असा विश्‍वास पाटील यांनी दिला.

पर्यावरण वाद्यांनी एकतरी झाड लावले का? असा प्रश्‍न माधुरी मिसाळ यांनी उपस्थित करत, तुमची सत्ता होती तर का झाडे लावली नाहीत. केवळ राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उज्वल केसकर यांनी सूत्रसंचालन केले.

“शिवसेना पुण्यातून संपली असे समजू नका’

युतीमध्ये “मतभेद’ झाले तरी मनभेद झाले नाही, त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी अधिक प्रयत्न केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मस्थळ असलेल्या पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे अनेकजण आम्हाला बोलतात. मात्र, “आता एकही जागा मिळाली नाही म्हणजे “शिवसेना पुण्यातून संपली असे समजू नका’, अशा प्रेमळ शद्बात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी नक्‍की कोणाला टोला लगावला? मात्र, कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

‘विरोधक खेकड्यासारखे एकमेकांच्या पायात पाय टाकून बसले आहे’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 वर्षांतील कॉंग्रेसचा उकिरडा बाजूला काढून या देशाचे नंदनवन केले आहे. नुसते निवडून यायचे, आश्‍वासने द्यायचे. मात्र, निवडून आल्यावर काहीच काम न करणाऱ्यांना आता जनतेने दूर केले आहे. राज्यातील विरोधी पक्ष कुठे गायब झाला, असे मतदार विचारत आहे. मात्र, हे विरोधक खेकड्यासारखे एकमेकांच्या पायात पाय टाकून बसले आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.