आम्हाला स्वबळावर बहुमत मिळाले तर आनंदच होईल – राम माधव

स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्‍यता नसल्याचे दिले संकेत

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचे संकेत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी एका मुलखतीत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला स्वबळावर 271 जागा मिळाल्यातर आनंदच होईल पण एनडीएला मात्र निश्‍चीत बहुमताचा आकडा पार करता येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे. आत्ता पर्यंत भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल असा आत्मविश्‍वास अरूण जेटली, अमित शहा यांनी व्यक्त केला होता पण आता राम माधव यांनीच अप्रत्यक्षपणे स्वबळावरील बहुमताचे भाजपचे स्वप्न धूसर झाल्याचे मान्य केले आहे.

ते म्हणाले की उत्तर भारतात भाजपच्या ज्या जागा कमी होणार आहेत त्या आम्ही ईशान्य भारत, पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यातून भरून काढू. आम्ही पुर्व भारतात आमचा विस्तार चांगला वाढवला आहे. पण आम्हाला दक्षिण भारतातही असाच विस्तार वाढवता आला असता तर आमची स्थिती अधिक चांगली झाली असती असे त्यांनी यावेळी नमूद केले. आम्हाला गेल्यावेळी जितके यश मिळाले तितके यश आम्हाला यावेळी मिळण्याची शक्‍यता कमी आहे कारण ऍन्टी इन्कबंसीचा तोटा आम्हाला सोसावा लागू शकतो असेही त्यांनी मान्य केले. गेल्या वेळी मोदी लाट होती यावेळी मोदींची सुनामी आली आहे असा दावा अनेक भाजप नेत्यांनी केला आहे पण आता मात्र त्यांचा आत्मविश्‍वास डळमळीत झाल्याचेच हे संकेत राम माधव यांनी दिल्याचे मानले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.