Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. नेत्यांच्या भेटी-गाठी, एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु आहेत. अशातच महाविकास आघाडीला एकत्र लढण्यासंदर्भात प्रस्ताव दिला असल्याची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत जायला तयार आहोत. याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहितीही जलील यांनी दिली आहे. दरम्यान आघाडी झाली नाही आणि आम्ही एकटे लढलो तर, पुन्हा ‘बी टीम’ म्हणून आमच्याकडे बोट दाखवू नका, इशारा देखील जलील यांनी दिला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, आम्ही तुमच्या सोबत येण्यासाठी आहोत. मात्र तुम्ही सोबत घ्यायला तयार नसाल तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू. नंतर माझ्याकडे बोट दाखवून भाजपची बी टीम असल्याचा आरोप करू नका, असे मी स्पष्टपणे सांगतो. मात्र आम्हाला समोरून सकारात्मक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चा होण्याची शक्यता वाटत असल्याचे जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, एमआयएम महाविकास आघाडी सोबत आल्यास महाविकास आघाडीची देखील शक्ती वाढू शकते. मात्र एमआयएमला सोबत घेण्यास उद्धव ठाकरे गटाचा विरोध असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे एमआयएमला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीतील नेते काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.