उदयनराजेंना सांभाळाल तर पक्ष सोडू 

रामराजेंचा इशारा : शरद पवार यांना आज भेटणार; जावळीतील जमिनी कोणी लाटल्या हे तपासा

फलटण – जावळी तालुक्‍यातील जमिनी कोणी लाटल्या हे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी तपासून पाहावे. तुम्हाला मताधिक्‍य कमी मिळाले, म्हणून आमच्यावर राग काढू नका. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या भेट घेऊन “खासदार उदयनराजेना तुम्ही सांभाळणार असाल तर आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी द्या,’ असे स्पष्ट ठणकावून सांगणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

निरा देवघरच्या पाण्यावरुन रामराजेंवर खासदा उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्याकड़ून सुरु असलेल्या आरोपांबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुनर्वसनाच्या जमिनीबाबत आपल्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे आरोप सिध्द करण्याची मागणी करत रामराजे म्हणाले, “”महसूल राज्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय योग्य होते का याचाही विचार करावा. ते स्वयंघोषित छत्रपती आणि आपण स्वयंघोषित महाराज आहोत. तथापि महाराज म्हणून घेताना आपण लोकांनी केलेल्या प्रेमातून ते स्वीकारले आहे. छत्रपतींचे घराणे आणि आपल्या घराण्याचे ऋणानुबंध मागील पिढीतील संबंधांचा विचार करुन आपण फारशी उत्तरे आतापर्यंत दिली नाहीत. तथापि आता आपल्याकडे असलेल्या माहितीचा वापर करुन ही मंडळी उत्तरे देण्यास भाग पाडतील. दुसरे खासदार आणि आमदार यांच्याबद्दलही वेळ आली असल्याने बोलावेच लागेल.”

“”माझ्यावर बोलणारे दोन खासदार आणि एक आमदार तिघेही यापूर्वी एकत्र होतेच. पूर्वी टेबलाखालून होत,े आता टेबलावर आले आहेत. त्यांना वाटले मी त्यांना भिईन, पण असले अनेक आमदार खांद्यावर घेतले असून एका खांद्यावर एकाला तर दुसऱ्या खांद्यावर दुसऱ्या खासदारला घेऊन फिरेल. मी कोणाला भीत नाही आणि भिणारही नाही,” असे त्यांनी सांगितले. छत्रपती म्हंणवून घेणाऱ्यांनी जावळी तालुक्‍यातील जमिनीवर क़ाय केले, कोणाच्या जमिनी लाटल्या हे सर्वाना माहित आहे. माझ्यावर पुनर्वसनाच्या जमिनी लाटण्याचे आरोप करणाऱ्या गोरेंनी पनवेलजवळील जमिनीचे क़ाय केले, असे सवाल रामराजेंनी केले.

छत्रपतींच्या पिढ्या माझ्या आजोबानी सांभाळल्यात याचे भान मला फलटणला येऊन बांडगूळ म्हणणाऱ्यांनी ठेवावे. तुम्ही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय. तर तुम्ही महसूल राज्यमंत्री असताना काय काय उद्योग केलेत, हे बाहेर काढणार आहे, असे आव्हान रामराजेंनी दिले. रामराजे म्हणाले, “”नीरा उजवा कालव्यातून फलटण तालुक्‍यातील 36, माळशिरस तालुक्‍यातील 16/17 आणि पंढरपूर तालुक्‍यातील काही गावांना भाटघर वीर धरणातील पाण्याबरोबर नीरा- देवघरचे पाणी गेली 10- 12 वर्षे दिले जात असल्याने या बागायती क्षेत्रात उसासह अन्य पिकाखालील क्षेत्रात मोठी
वाढ झाली. मुळच्या नियोजनाप्रमाणे नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात 65 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत होते. त्यामध्ये जवळपास चौपटीने वाढ झाली आहे.

शासनाने दि. 12 जून रोजी घेतलेल्या निर्णयामुळे आता या बागायती पट्ट्यातील गावांना मिळणारे नीरा देवघरचे पाणी बंद होणार आहे. तेथील पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेताना नीरा देवघरचे पाणी मात्र विनावापर राहणार ाहे, हे विचारात घेण्याची आवश्‍यकता आहे. हे पाणी गावडेवाडी (ता. खंडाळा) येथील नियोजित उपसा सिंचन योजनेद्वारे धोम बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यात सोडण्याचा निर्णय झाल्यास तेथून नीरा देवघरच्या लाभक्षेत्राला पाणी देता येणार आहे. त्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. शेती व शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि विनावापर राहणाऱ्या पाण्याचा वापर सुरु होण्यासाठी विनंती करणार आहे.” भाटघर, वीर धरणाच्या पाणी वापराची सिस्टीम गेल्या अनेक वर्षापासून उत्तम पध्दतीने, नियोजनपूर्वक सुरु असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

अशा परिस्थितीत मंत्रीमहोदयांनी प्रशासनाचा अहवाल नाकारुन सिस्टीम अनस्टेबल करण्याचा निर्णय घेतला. फलटण व अकलूज या मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या पिण्याचे पाणी पुरवठा योजना पाणीसाठा कमी झाल्याने अडचणीत येणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, “”त्याचबरोबर नीरा देवघरचे पाणी उपलब्ध होत असल्याने नीरा उजवा कालव्यावरील आठमाही क्षेत्रास प्रामुख्याने माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्‍यातील पाणी देता येत होते. या निर्णयामुळे या क्षेत्राला उन्हाळी हंगामामध्ये पाणी देता येणार नाही. कारण हे क्षेत्र नीरा देवघरच्या लाभक्षेत्रात नाही, याचाही विचार करावा लागणार आहे.” आतापर्यंत बागायत पट्ट्यातील आवर्तन कालावधी 15 दिवसांनी कमी होऊन उन्हाळी हंगामात दोनऐवजी एक रोटेशन देणे शक्‍य होणार असल्याने उसाखालील क्षेत्राला मोठा फटका बसण्याचा धोका रामराजे यांनी निदर्शनास आणून दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.