पुणे – प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे दस्ताऐवज करण्यासाठी ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपरच वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घेतले आहे. परंतु, या स्टॅम्पचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मिळत नसेल, तर नागरीकांना १०० रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तशा सूचना देखील मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
शासकीय कार्यालय सोडून अन्य कामांसाठी म्हणजे प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र आदी कामांसाठी १०० ते २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर केला जात होता. वर्षभरात अंदाजे आठ ते दहा लाख स्टॅम्पची विक्री होत होती. हे स्टॅम्प पेपरची किंमत आणि प्रत्यक्षात त्यांची छपाईसाठी येणार खर्च पाहता ही किंमत कमी असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे म्हणणे होते. त्यामुळे या स्टॅम्प पेपरच्या किमतीमध्ये वाढ करावी, असा प्रस्ताव यापूर्वीच विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता.
त्यास राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मान्यता देत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बदल केला. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना १०० अथवा २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी प्रत्येक कामासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून ५०० रूपयांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.