जर भविष्यच नसेल तर शिकायचं कशासाठी?

“जर भविष्यच नसेल तर शिकायचं कशासाठी?” आणि “शिकलो तरी सरकार शिकलेल्यांचं ऐकतयच कुठं?” असे दोन अगदी साधे प्रश्‍न घेऊन ग्रेटा थन्सबर्ग गतवर्षी ऑगस्टमध्ये स्वीडनच्या संसदेबाहेर आंदोलनाला बसली. जेमतेम 15 वर्षांची ग्रेटा जागतिक वातावरण बदलाविरोधात एकटीच ऊभी ठाकली होती. ऑगस्टमधल्या ‘त्या’ शुक्रवारपासून दर शुक्रवारी आपल्या शाळेला दांडीमारून संसदेबाहेर हातात एक पोस्टर घेऊन बसने ग्रेटासाठी नित्याचे झाले होते.

एवढीशी लहान पोर ‘ती’ सत्तेवर बसलेल्या ‘पावरफुल’ लोकांचं काय बिघडवणार? कदाचित संसदेबाहेर आंदोलनाला बसलेल्या ग्रेटाला पाहून अनेकांना असा प्रश्‍न पडला असेल. मात्र गतवर्षी ऑगस्टमध्ये वातावरणबदलाविरोधातल्या या एकटीच्या “स्कुल स्ट्राईक फॉर क्‍लायमेट’ आंदोलनात आता ग्रेटा एकटी राहिली नाही. येत्या शुक्रवारी 15 मार्चला या एकट्या शाळकरी मुलीने छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जगभरातील 82 देशांमधील 957 शहरांमधली शाळकरी मुलं वातावरणबदलाविरोधात आंदोलन करणार आहेत. जगभरामध्ये आज ग्रेटाला वातावरणबदलाविरोधातील लढ्याची प्रेरणा म्हणून पाहिलं जातंय.

वातावरणबदलाविरोधातील या लढाईच्या प्रेरणेबाबत ग्रेटा सांगते की, “माझ्या लहानपणीचा एक किस्सा मला आठवतो आम्हाला शाळेमध्ये समुद्रात फेकण्यात आलेले प्लास्टिक, ध्रुवीय अस्वलांवर वातावरणबदलाचा परिणाम याबाबतचे काही व्हिडीओज दाखविण्यात आले. ते पाहिल्यावर आम्ही सर्वच खूप भावनिक झालो. काही वेळाने माझे सर्व मित्र-मैत्रिणी त्याबाबत विसरून गेले मात्र मी ते व्हिडीओज विसरू शकले नाही.” लहानपणापासूनच ग्रेटा अशाप्रकारची व्यक्ती आहे जी सहजासहजी गोष्टींना विसरू शकत नाही. बरेच लोक आपल्याला चिंतेत टाकणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतात मात्र ग्रेटा चिंतेत टाकणाऱ्या गोष्टींबाबत सतत विचार करत राहणारी व्यक्ती असल्याने तिने याबाबत काहीतरी करण्याचा चंग बांधला. वयाच्या आठव्या वर्षी ग्रेटाला पहिल्यांदा वातावरणबदलाविषयी माहिती पडले त्यानंतर तिने वातावरणबदलाविषयी वृत्तपत्र आणि मासिकांमधून वाचन करायला सुरुवात केली मात्र सुरुवातीला तिला आपण खूपच लहान असल्याने आपण एवढ्या मोठ्या समस्येविरोधात कसे लढणार असा विचार येत असे. सततच्या विचारांमुळे ग्रेटा एकलकोंडी बनली होती मात्र तिने आपल्या मनातील घुसमट हळूहळू आपल्या आई-वडिलांजवळ उघड करायला सुरुवात केली आई-वडिलांजवळ व्यक्त झाल्याने ग्रेटाला हलके वाटू लागले. आपल्या भावना मनातच घुसमटून ठेवण्यापेक्षा इतरांजवळ मांडल्यास मन हलके होते या विचारातून तिने या लढाईला सुरुवात केली होती. घरात बसून चिंताग्रस्त राहण्यापेक्षा संसदेबाहेरच्या रस्त्यावर बसून वातावरणबदलाच्या समस्येला तोंड फोडण्याचे ग्रेटाने ठरवले.

स्वीडनमधील निवडणुका पूर्ण होईपर्यंत दररोज संसदेबाहेर आंदोलन करण्याचे ग्रेटाने ठरविले आणि 20 ऑगस्ट 2018ला ग्रेटा पहिल्यांदा आपल्या शाळेला दांडी मारून संसदेच्या बाहेर आंदोलनाला बसली. त्या दिवशी ती एकटीच होती मात्र हळूहळू लोक तिच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ लागले. ग्रेटाने ठरवल्याप्रमाणे स्वीडनमधील निवडणुका पूर्ण होईपर्यंत दररोज संसदेबाहेर आंदोलन केले. हजारो लोकांच्या पाठिंब्यामुळे ग्रेटाचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी तिला चर्चेसाठी देखील बोलावले. या लहानग्या ग्रेटाने या बैठकीत स्वीडनच्या राजकारण्यांना, “मी माझ्या मनामध्ये जी भीती घेऊन जगतेय ती भीती जेव्हा तुमची झोप उडवेल तेव्हा तुम्ही वातावरणबदलाविरोधात पावले उचलाल. मला तुम्हाला माझ्या मनातील भीतीशी ओळख करून द्यायची आहे.” असं तिने ठणकावून सांगितलं होतं.

जगातील काही मोजक्‍या लोकांच्या राक्षसी विकासाच्या हट्टासाठी पृथ्वीवरील जीवसृष्टीचे भविष्य धोक्‍यात घातलं जातंय. काही लोकांच्या आरामदायीजीवनासाठी बहुतांचे आयुष्य धोक्‍यात टाकलं जातंय. तुम्ही म्हणता तुम्ही आपल्या मुलांच्या भविष्याची सर्वाधिक काळजी घेता मात्र वास्तवात तुम्ही त्यांचे भविष्य नष्ट करत आहात. वातावरणबदलाबाबत आता राजकीयदृष्ट्या काय करणं शक्‍य आहे यापेक्षा वातावरणबदलाबाबत आपल्याला आता काय करणं गरजेचं आहे असा विचार करायला हवा असं ती सांगतीये.

– प्रशांत शिंदे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)