मुंबई: आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलाच चर्चेत आला. मुस्लिम आरक्षण, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना असे अनेक मुद्दे आज चर्चेत आले. दरम्यान, अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार मुस्लिम आरक्षण देणार आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे विधान मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानपरिषदेत केले. धर्माच्या आधारावर आरक्षण नको, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेची भूमिका काय, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.
आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिले आहे आणि त्यात मुस्लिमांना सुद्धा फायदा मिळतोच आहे. पण सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली, कुठे-कुठे सेटिंग झाले, याची संपूर्ण माहिती पुढे आली पाहिजे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, आमचे स्पष्ट मत आहे. असे आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, तर त्याचा मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सुद्धा मोठा परिणाम होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.