वर्ष उलटले तरी मिळेना बोंडअळी नुकसानीचे अनुदान

शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयासह बॅंकेत चकरा

बॅंकेकडून माहिती देण्यास टाळाटाळ

कुकाणा स्टेट बॅंक शाखेत कर्मचाऱ्यांकडून खातेदारांशी अरेरावी केली जाते. बॅंकेत जाऊन बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांची माहिती विचारली असता, आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. बोंड अळीची यादी तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही तहसीलकडून घ्या, असा फुकटात सल्ला देऊन कर्मचारी आपली जबाबदारी झटकत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

नेवासा  – राज्यासह जिल्ह्यात सध्या भयानक दुष्काळ पडला असून, शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. शेतकरी पाण्यासाठी धडपड करत आहेत. सन 2018 च्या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन पीक भुईसपाट झाले. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. अनुदान व नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मागणी केल्यावर शासनाकडून शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान ऑगस्ट 2018 मध्ये कुकाणा येथील स्टेट बॅंकेत तहसील कार्यालयाने जमा केले. मात्र अद्यापही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी तहसील कार्यालय व बॅंकेत चकरा मारत आहेत.

याबाबत कुकाणा येथील स्टेट बॅंकेच्या शाखेत विचारणा केली असता, उत्तर देण्यास टाळाटाळ केली जाते. खातेदार व बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांनी बॅंकेकडे एक वर्षाचे व्याज देण्याची लेखी मागणी केली असून, व्याज दिले नाही तर बॅंकेला कुठलीही कल्पना न देताच आंदोलन करण्याचा इशारा व ग्राहक मंचाने दिला आहे. त्यामुळे तहसील व बॅंकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याने भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डिले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत नेवासे तहसीलदार सुराणा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता, त्यांनी या या प्रश्‍नात लक्ष घालत बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र शाखाधिकारी बॅंकेत हजर नसल्याने इतर कर्मचाऱ्यांकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांची माहिती नसल्याने बॅंकेचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. शासनाच्याच अधिकाऱ्यांकडून शासनाच्याच अनुदानासाठी वर्षभर बॅंकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली असल्याने या वर्षभराच्या काळातील 16 हजार 200 रुपये व्याज द्यावे, अशी मागनी तेलकूडगाव येथील शेतकरी बाळासाहेब काळे यांनी लेखी अर्जाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.