जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा मोदींना खोचक सवाल

नवी दिल्ली : दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. यावेळी सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचे म्हटले होते.

आता मोदींच्या या दाव्यावरुन भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झाली आहे. याचसंदर्भात शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही मोदींच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे.

मोदींच्या या वक्तव्यासंदर्भात ट्विट करताना चतुर्वेदी यांनी इंदिरा गांधीचा थेट उल्लेख टाळला असला तरी १९७१ साली भारतीय पंतप्रधानांनी अनेक देशांच्या विरोधाचा सामना करत बांगलादेशला मदत केल्याचे म्हटले आहे. “१९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेसारख्या देशाने केलेल्या विरोधाचा सामना करुनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. मला प्रश्न पडला आहे की जर सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल,” असे ट्विट चतुर्वेदी यांनी केले आहे.

दरम्यान, सावर येथील भाषणामध्ये मोदींनी बांगलादेश स्वातंत्र्यासाठी केलेलं आंदोलन आणि अटकेचा उल्लेख केला. “मी बांगलादेशातील बंधू, भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असे देखील मोदींनी म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.