पुणे – सहकार चळवळ महत्वाच्या टप्प्यावर उभी आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या- वाईट गोष्टी असतात, पण व्यवस्था वृध्दिंगत करायची असेल, तर नितीमूल्य महत्वाची आहेत, असे उद्गार सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी समर्पण पुरस्कार वितरण सोहळयात काढले. ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी बॅंकांनी ज्या समर्पित भावनेने कोरोनाच्या काळात सेवा दिल्या, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अनिल कवडे आपल्या भाषणात बोलताना पुढे म्हणाले की, कोरोना काळात खातेदारांना मदत करण्याचे भान सहकारी बॅंकांनी राखले. त्यामुळेच सहकारी बॅंकांचा गौरव करणे महत्वाचे ठरते. ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे गौतम कोतवाल म्हणाले की, करोना योध्यांच्या खांदयाला खांदा लावून सहकारी बॅंकांनी आर्थिक सेवा दिली.
कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे म्हणाले की, खातेदारांच्या गरजा ओळखून सुविधा दिल्या तर, खातेदार कुठेही जाणार नाहीत. आपल्या कामकाजात व्यावसायिकता यावी यासाठी सनदी लेखापालांनी या क्षेत्रात काम करणे आवश्यक आहे. सहकारी चळवळ जपली पाहिजे, त्याकरिता आपण एकमेकांचा हात धरून मार्गदर्शन देत-घेत पुढे जाऊ या.
यावेळी 55 सहकारी बॅंकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, कॉसमॉस बॅंकेचे समूह अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, उपाध्यक्ष ऍड. प्रल्हाद कोकरे, संचालक अजित गिजरे व सहव्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्राची घोटकर यांनी केले.
फोटो ओळी: छायाचित्रात डावीकडून गौतम कोतवाल, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, सहकार आयुक्त अनिल कवडे, एअरचिफ मार्शल (निवृत्त) भूषण गोखले.