वीज पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्याला जबाबदार धरणार – उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – कोणत्याही तांत्रिक कारणांशिवाय किंवा हलगर्जीपणामुळे फीडर बंद होऊन वीज पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्याला जबाबदार धरले जाणार आहे. तसेच त्याचा परिणाम त्यांच्या वेतनवाढीवरही होणार असल्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच राज्यात वीज मीटरचा अजिबात तुटवडा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात मीटरचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना वीज जोडणी मिळत नाही. वेळप्रसंगी नागरीकांना अंधारात राहण्याची वेळ येते. तसेच वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा अधिकारी-कर्मचारी उडवा-उडवीची उत्तरे देतात असा अनुभव असल्याबद्दल विधानसभेत आमदार किसन काथोरे, संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर आदी सदस्यांनी लक्ष्यवेधी मांडली होती.

उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, मध्यंतरी 4 महिने वीज मीटरचा तुटवडा होता. याचे कारण म्हणजे केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत 31 मार्च 2019 पूर्वी 15 लाख 18 हजार ग्राहकांना वीज कनेक्‍शन दिले. त्यामुळे तेवढ्या कालावधीसाठी ग्राहकांना नवीन मिटर मिळू शकले नाही. पण कोणताही नागरिक विजेशिवाय वंचित राहिला नाही. सध्या 48 लाख मीटर खरेदी करण्यात आली. त्यापैकी 28 लाख मीटर प्राप्त झाले आहेत. राज्यात दरवर्षी 10 लाख नवीन मीटर घेतले जातात. राज्यात वीज मीटरचा अजिबात तुटवडा नाही. मीटर मिळू शकले नाही या काळात ज्या ग्राहकांची बिले अधिक आले असतील त्यांची बिले दुरूस्त करून दिले जातील, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.
शाळांना 10 टक्के रक्कम भरावी लागणार

शाळांचा वीजपुरवठा थकित बिलामुळे खंडित झाला असल्यास शाळांनी किमान 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. शाळांना आता सार्वजनिक सेवा गटात टाकल्यामुळे शाळांचे बिलही कमी येत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

…तर अपघातग्रस्तांना मदत मिळणार
3 वर्षाच्या मुलीला शॉक लागून ती भाजली आहे, याकडे आ. संदीप नाईक यांनी लक्ष वेधले. यावर ऊर्जामंत्री म्हणाले, या प्रकरणात महावितरणची चूक असल्याचे प्रमाणपत्र इलेक्‍ट्रिकल इन्सपेक्‍टरने दिले तर संबंधित मुलीला मदत करण्यात येईल. तसेच साहित्य खरेदीचे अधिकार आता स्थानिक अधिकाऱ्यांना दिले असून सहित्याची कोणतीही कमतरता नसल्याचे ऊर्जामंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.