‘मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास उद्रेक होईल’- उदयनराजे भोसले

पाटण – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा असाच सुरू राहणार आहे. मराठा समाजातील पुढच्या पिढ्यांवर अन्याय होऊ नये, आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण न मिळाल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल. तो कोणही रोखू शकणार नाही. असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला.

मराठा समाजाच्यावतीने पाटण तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले होते; परंतु राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तहसीलदारांच्या विनंतीनुसार 48 व्या दिवशी खा. उदयनराजेंच्या हस्ते कार्यकर्त्यांना पाणी देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. अण्णासाहेब पाटील फौंडेशनचे चेअरमन नरेंद्र पाटील, सुनील काटकर, विक्रमबाबा पाटणकर, मराठा समाजबांधव उपस्थित होते.

इतर समाजाच्या आरक्षणावेळी कोणताही आयोग स्थापन करण्यात आला नव्हता; परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य शासनाने गायकवाड आयोग नेमला. सगळे पुरावे, माहिती देऊनही आरक्षण मिळत नसल्याने भविष्यात उद्रेक झाल्यास कोणीही रोखू शकणार नाही.

मराठा समाज न्याय्य हक्कांसाठी लढत आहे. इतर समाजावर आलेल्या संकटांमध्ये मी पुढाकार घेऊन, त्यांना दिलासा दिला होता. अन्य समाजावर अन्याय न होता, न्यायपालिकेने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. हे आरक्षण नक्की मिळेल, असा विश्‍वास खा. उदयनराजेंनी व्यक्‍त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.