“सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या…”; सभागृहात फडणवीस आक्रमक

व्हायरल पोस्टवरून सरकारवर निशाणा ;उपमुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी फडणवीसांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट सरकारच्या नैतिककेवरच बोट ठेवले. त्यामुळे अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उठून त्यासंदर्भात खुलासा करावा लागला आणि फडणवीसांची मागणी मान्य करावी लागली.

आज विधानसभेमध्ये जळगावच्या शासकीय वसतिगृहात झालेल्या प्रकारावर चर्चा झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ६ वरीष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे वसतिगृह प्रशासनाला क्लीनचिट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशाच एका प्रकरणाचा हवाला देण्यासाठी उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख सभागृहात केला.

“उस्मानाबादमध्ये हनुमान चौकात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने सुसाईड नोटमध्ये केला आहे”, असे फडणवीसांनी म्हणताच नाना पटोलेंनी यावर एक व्हायरल पोस्ट वाचून दाखवली. “फडणवीसांबद्दलचीही एक पोस्ट व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका तृतीयपंथीशी खोटे आश्वासन देऊन अनैतिक संबंध ठेवले असल्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. अशा पोस्ट व्हायरल होत असतात”, असे नाना पटोले म्हणाले.

या मुद्द्यावरून सभागृहात भाजपा आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. “माझे मित्र नाना भाऊ यांचा मी आभारी आहे. त्यांनी चांगल्या भावनेतून त्या पोस्टविषयी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या चिंचवडमधल्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली आहे. याची तक्रार देखील करण्यात आली आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात काहीही लिहिलं तरी त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशा पद्धतीने लिहितो आणि त्यावर कारवाई केली जात नाही. या सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे”, अशी मागणी फडणवीसांनी केली. अखेर त्यावर “कार्यकर्ता कुणाचाही असो, त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर आजच्या आज कारवाई केली जाईल आणि त्याला अटक केली जाईल”, असे आश्वासन अजित पवारांनी दिल्यानंतर विरोधकांचे समाधान झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.