शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार

पाटण  – पाटण तालुक्‍यात चालूवर्षी जुलै ते नोव्हेंबर अखेर सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचे पुर्णपणे नुकसान होऊन सर्व प्रकारची पिके वाया गेली आहेत. शेतकरी शासकीय मदतीची वाट पाहत आहेत. परंतु पावसाप्रमाणेच शासनाने सुध्दा शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे. अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नसून काही ठिकाणी फक्त नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत.

पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळालेले नाही. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. आठवडाभरात संपूर्ण तालुक्‍यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन पंधरा दिवसांत नुकसान भरपाईसह सरसकट कर्ज माफी न मिळाल्यास सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाटणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला आहे.

पाटण तालुक्‍यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी पाटणकर यांनी प्रत्यक्ष शिवारात जावून केली. यावेळी सुभाषराव पवार, विजय शिंदे, शंकरराव पवार, अभिजीत साळुंखे, शासकीय कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. पाटणकर म्हणाले, परतीच्या पावसाने शेतजमीन, उभी पिके, शेती पंप यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेली अनेक दिवस परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले असून हातातोंडाशी आलेली पिके कुजून गेली आहेत. जी काही पिके राहिली आहेत त्यांची काढणी सुरु आहे.

मात्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरुच असल्याने उरलेल्या पिकांचेही नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. परिणामी बॅंकांची कर्जे कशी फेडायची याची विवंचना लागून राहिली आहे. महाराष्ट्रातील जनता ओल्या दुष्काळात होरपळत असताना हे राज्यकर्ते सत्ता वाटपासाठी भांडत आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. प्राधान्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर या शेतकऱ्यांना 100 टक्के मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर शासनाने वेळेत शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी शासनाला दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.