पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 2007 सालापूर्वीच्या सर्व रहिवासी, व्यापारी, वाणिज्य, औद्यागिक व मोकळ्या जागेतील मिळकतींना अडीच पट करवाढ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. या करवाढीला विरोध करत ही वाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.
सचिन चिखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून महापालिकेचा उल्लेख होतो. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यापासून महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपा कोसो दूर आहेत. तरी 2007 सालापूर्वीच्या सर्व मिळकतधारकांवर आयुक्त अन्यायकारक अडीचपट करवाढ लादू इच्छित आहेत. या निर्णयामुळे शहरातील 2 लाख 24 हजार व त्यापेक्षा अधिक जुन्या निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांना फटका बसणार आहे.
आयुक्तांनी सर्वप्रथम शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन, मिळकतकराबाबत सर्वमान्य व हिताचा निर्णय घ्यावा. तूर्तास सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून 2007 सालापूर्वीच्या सर्व रहिवासी, व्यापारी, वाणिज्य, औद्यागिक व मोकळ्या जागेतील मिळकतींना आकारणारा अडीच पट करवाढीचा विषय म्यान करा व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या. अन्यथा येत्या आठ दिवसांत अन्यायकारक मिळकत करवाढीचा विषय रद्द न झाल्यास मनसेच्या माध्यमातून खळ-खट्याक आंदोलन केले जाईल.