नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनीही या वेळी काँग्रेस परिवारात दाखल झाल्याचे सांगितले. दरम्यान या दोघांच्या पक्ष प्रवेशानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कन्हैया कुमार यांच्या पक्ष प्रवेशावर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनीही याबाबत प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. “जर कोणी गटारातून बाहेर पडून नाल्यात पडला तर मी फक्त त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो,” अशी प्रतिक्रिया कैलास विजयवर्गीय यांनी दिली आहे. पश्चिम बंगालच्या भवानीपूर येथून ते बोलते होते.
"If someone comes out of the gutter and falls into the drain, then I can only sympathise with him," BJP National General Secy Kailash Vijayvargiya respond to the former CPI leader Kanhaiya Kumar joining the Congress (28.09) pic.twitter.com/lZryf1wamK
— ANI (@ANI) September 29, 2021
कन्हैया कुमार यांना राहुल गांधींनी पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. तरुण नेता म्हणून डाव्यांच्या राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या कन्हैया कुमारने फारच कमी वेळात डाव्यांच्या बड्या नेत्यांच्या उंचीच्या बरोबरीने आपले स्थान निर्माण केले. कन्हैया कुमारने सीपीआय सोडल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“त्याने (कन्हैया कुमार) स्वतःला माझ्या पक्षातून बाहेर काढले. सीपीआय जातिहीन, वर्गहीन समाजासाठी लढत आहे. त्यांच्या काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि ध्येये नक्कीच असतील. कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारसरणीवर त्याचा विश्वास नसल्याचे यावरून दिसून येते,” असे डी राजा यांनी म्हटले आहे.