ठरलं तर! एमपीएससीच्या परिक्षा मार्च, एप्रिलमध्ये होणार

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे मागच्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये रद्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता मार्च आणि एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एमपीएससीच्या तीन परीक्षांच्या नवीन तारखा आज जाहीर करण्यात आल्या.

एमपीएससीच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती आहे.यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा -2020 ही रविवार 14 मार्चला घेण्यात येईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2020 आता 27 मार्चला होईल. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 11 एप्रिल 2021 ला घेण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने-एमपीएससीने नियमांमध्ये बदल करत परीक्षार्थींच्या प्रयत्न किंवा संधीच्या संख्येला मर्यादा घालून दिली होती.

नव्या बदलानुसार, त्याप्रमाणे आता प्रत्येक खुल्या गटातील प्रत्येक उमेदवाराला सहा संधी मिळतील अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.तसंच, उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.

एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.

परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू होण्यात येईल. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे IAS, IPS या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांसाठी सुद्धा संधीची संख्याही अशीच आहे. MPSC परीक्षांसाठी खुल्या वर्गासाठी सध्या वयोमर्यादा 38 वर्षे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.