मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील काही केल्या थांबताना दिसत नाही. कारण आता चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘उर्फीवरची टीका हा राजकारणाचा विषय नाही, तसेच स्वैराचाराच्या नावावर डोळे बंद करून बसणार नसल्याच्या’ शब्दात चित्रा वाघ यांनी उर्फीला आणखी एकदा फटकारले आहे.
औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केली. याविषयी बोलताना,’महाराष्ट्रातील एका महिलेने मला उर्फीचा एक व्हिडीओ पाठवला. त्या महिलेच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. त्यांनी मला मेसेज पण केले. माझा या क्षेत्राची काहीही संबंध नाहीये. मला जर तुम्ही विचारलं की, बॉलिवूडबाबत तर मला सांगतला येणार नाही. जेव्हा त्या महिलेनं उर्फीच्या व्हिडीओच्या लिंक्स पाठवल्या, तेव्हा मी पाहिलं की, एक बाई उघड्या नागड्या परिस्थितीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरतीये. बाकीचे फोटो पाहिले तर ते आणखी भयानक होते. कुठलाही धर्म असे कपडे घालण्याची शिकवण देत नाही.’असे त्या म्हणाल्या.
तसेच ‘उर्फीमुळे विकृती वाढते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जिन्स पॅन्ट घालणं आणि उर्फी जे घालते ते वेगळं आहे. मी एवढी निर्लज्ज बाई पाहिली नाही. आम्ही स्वैराचाराच्या नावावर डोळे बंद करुन बसणार नाही. उर्फीला जेलमध्ये टाकणं हा माझा मोटो नाहीये. इतर प्रश्न देखील आहे, त्यावर देखील आम्ही काम करत आहोत. आज जर हिला थांबवलं नाही तर, अजून दहा जणी नागड्या फिरतील.’ असा संताप देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उर्फी जावेद हिच्यावर चित्रा वाघ या दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मात्र चित्रा वाघ यांच्या कोणत्याही इशाऱ्याचा उर्फीवर काहीही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. उलट ती आणखी बोल्ड होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तर उर्फीने ट्विट च्या माध्यमातून चक्क हिंदू संस्कृतीचा उल्लेख करत चित्रा वाघ आणि भाजपवर टीका केल्याचे दिसून आले.