‘शरद पवारांना जर भाजपसोबत जायचे असते तर…’

पुणे – शरद पवारांच्या नावाने राज्यातील लोकांची दिशाभूल केली जात आहे. शरद पवारांना जर भाजपसोबत जायचे असते तर ते आम्हा सर्वांना घेऊन ते गेले असते, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, जर खरंच शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर त्यांनी आम्हा सर्वांना सांगितले असते, आम्हाला सोबत घेऊन ते भाजपमध्ये गेले असते. त्यांच्या मनात तसे काहीच नव्हते. पवार साहेबांनी सुरवातीपासून कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत जायचे ठरवले होते. निवडणुकीत कॉंग्रेस आमचा सहयोगी पक्ष होता, त्यामुळे आम्ही आधी त्यांना विश्‍वासात घेतले आणि नंतर शिवसेनेसोबत चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन वेळा दिल्लीतही चर्चा झाली. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये एक समान कार्यक्रम ठरवण्यात आला. त्यानंतर तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापन केली. शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याबद्दल त्यांनी ठरवले असते तर त्यांना कोणी अडवलंदेखील नसत, असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत भुजबळ यांना विचारले आले असता ते म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार हा पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्याचा निर्णय घेतला जाईल, अशी शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.