पाटलांनी माफी न मागीतल्यास बदनामीचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ

कोल्हापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सर्व आरोप खोडून काढत चोख प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील त्यांच्या अज्ञातावर बोलतात आणि स्वतःचं हसू करुन घेतात, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी ग्रामविकास विभागावर केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला.

हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास विभागावर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी माहितीच्या आधारे आपले वक्तव्य केले असते तर मी समजू शकलो असतो. पण त्यांनी अज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे वक्तव्य केले आहे.

14व्या वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे राज्य सरकारला घेता येत नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र, 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाबाबत केंद्राच्या कोणत्याही सुचना नाहीत. ते ग्रामपंचायतीला खर्च करता येत नाहीत. ते राज्य सरकारच्या सुचनेप्रमाणेच खर्च करावे लागतात. करोनाशी संघर्ष करत असताना आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक औषधाचा उपयोग केल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढेल, असे सांगितले.

त्यामुळे राज्य सरकारने निविदा काढून हे औषध खरेदी करायचं आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही निविदा 23 रुपयांनी आली. त्यामुळे आम्ही योग्य दर नसल्याने निविदा रद्द केल्या आणि आर्सेनिक खरदीचे अधिकार जिल्हा परिषदांना दिले, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
निविदा रद्द केल्याने हे पैसे ग्रामपंचायतींनाच खर्च करण्यासाठी देण्यात आले. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी आपल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी.

पुणे जिल्हा परिषदेने या गोळ्यांची खरेदी देखील केली आहे. जर चंद्रकांत पाटलांना 2 रुपयांमध्ये या गोळ्या मिळत असतील तर त्यांनी राज्यातील 35 जिल्ह्यांना खरेदी करुन द्याव्यात, असेही आवाहनही त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.