पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले, तर साताऱ्यातून लढणार!

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेच्या उमेदवारीबाबत आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. दक्षिण कराड विधानसभा मतदार संघातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले तर सातारा लोकसभा मतदार संघातून लढणार, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिले. उदयनराजेंनी जनतेला गृहीत धरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यादरम्यान पिंपरी-चिंचवडमधील एका जागेवर दावा करताना मतदार संघाचे नाव त्यांनी जाहीर न केल्यामुळे मतदार संघाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातारा लोकसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्‍यता आहे. उदयनराजे यांच्याविरोधात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना उतरविण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे, त्याबद्दल चव्हाण बोलत होते.

वंचित आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न
विधानसभेला वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेणार का असे विचारले असता, जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुका आल्या की धार्मिक ध्रुवीकरण करायचे राजकारण भाजप करीत आहे. त्यामुळे वंचित आघाडीला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र डॉ. प्रकाश आंबडेकर यांच्या मागण्या अवास्तव मागण्या या त्यांच्या राजकीय अपरिपक्‍वतेचे लक्षण आहे. त्यांच्या चुकीमुळेच लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची 8 माणसे निवडून आली आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसोबत बसून तोडगा काढला जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.