एक करोना रुग्ण सापडला तर बाजूची २० घरं होणार सील; ‘या’ राज्याचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत. परंतु,आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरं कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २० घरं सील केली जाणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जाणार आहेत.

राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. शहरी भागांमध्ये करोना रुग्ण आढळून आल्यास २० घरं सील केली जातील आणि त्या भागाला कंटेनमेंट झोन असे जाहीर केले जाईल. एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास ६० घरं सील करुन त्यांना कंटेनमेंट झोन जाहीर केलं जाईल. या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही किंवा तेथील कोणत्याही व्यक्तीला बाहेर येता येणार नाही. १४ दिवसांसाठी हे नियम लागू असतील, असे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

इमारतींसाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या मजल्यावर करोना रुग्ण आढळून आला तर संपूर्ण मजला सील केला जाईल. एखाद्या ठिकाणी एकाहून अधिक रुग्ण आढल्यास त्या इमारतीला कंटेनमेंट झोन जाहीर केले जाईल. १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर कंटेनमेंट झोनमधून या इमारतींचे नाव हटवले जाईल.

उत्तर प्रदेशचे अपर मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांमध्ये राज्यात करोनाचे चार हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात १९ हजार ७३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आठ हजार ८८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत तीन कोटी ५४ लाख १३ हजार ९६६ चाचण्या झाला आहेत. रविवारी ७८ हजार ९५९ नमुने आरटी पीसीआर चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.