जेजुरी – धनगर नेते गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद यांना असलेला विरोध तीव्र होत असताना राज्यातील दुसरे धनगर नेते महादेव जाणकर शरद पवारांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे. जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमात माजी मंत्री जाणकर यांनी शरद पवारांसमोर एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट दिल्लीच्या तख्ताचे समीकरण मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठा आणि होळकर समाजाची शिवाजी महाराजांनी सोयरिकीची मोट बांधली होती. याचा आधार घेत जानकरांनी पवारांना दिल्लीची गादी हस्तगत कशी करता येईल, याबाबत सांगितले. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो, असे जानकर म्हणाले.
दरम्यान आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत, असं आवाहनही जाणकर यांनी केले.