मुंबई : आज मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मनसेच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच भडकले आहे. “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. करोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात राज यांनी संताप व्यक्त केला.
दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचं संकट पुन्हा येतंय असं दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असं राज ठाकरे म्हणाले. मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं सरकारच्या मनात आहे की नाही? याबाबत माहिती नाही. यांना फक्त संभाजीनगरसारखं करायचं आहे. हा दिवस आल्यानंतर सरकारला जाग का येते. त्यांना असं का बोलावसं वाटतं. सरकारला तुम्ही या गोष्टी विचारायला हव्यात, असे म्हटले.
ते म्हणाले की, स्वाक्षरीची मोहिम पहिल्यांदा होतेय असं नाही. माझी विनंती आहे की, मराठी बांधवांनी स्वाक्षरी मराठीतून करावी. मी सगळीकडे मराठीतच सही करतो. प्रत्येक वेळेला नुसती आसवं गाळत बसण्यात अर्थ नाही. आपण अशा कृतीतून भूमिका घ्यायला हवी, असं राज ठाकरे म्हणाले. कलाकारांच्या आत्महत्यांसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, माझ्याकडे काही कलाकार येऊन गेले. त्यांच्यासाठी काही थिएटर्स उघडले गेले. कलाकारच नाही तर सगळेच अडकले होते. सगळेजण सावरत आहेत.