सातारा – ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सगळ्याच मशीनमध्ये असं असेल असं मी म्हणत नाही मात्र मी हे पाहिलेलं आहे म्हणून मी काळजी व्यक्त केली असे पवार म्हणाले. यासाठी आम्ही कोर्टात गेलो, मात्र दुर्दैवानं कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं नाही. आम्ही 50 व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या. त्या चिठ्ठ्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षा मोठ्या देखील होत्या, असेही पवार यांनी सांगितलं. दरम्यान, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची गुरूवारी 60 वी पुण्यतिथी आहे. यावेळी संस्थेचे सदस्य रामराजे ना.निंबाळकर, प्रा. डॉ. एन.डी.पाटील, आ.दिलीप वळसे-पाटील, आ.अजित पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विश्वजीत कदम आदी उपस्थित राहणार होते.