लखनऊ : योगगुरू स्वामी रामदेव यांनी नुकतेच देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अंबानी आणि अदानी यांना टोला लगावला होता. त्यानंतर त्यांनी आणखी एक वक्तव्य केले असून त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी, ‘जर मी देशाऐवजी व्यापाराचा विचार केला असता तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो, असे म्हटले आहे.
कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी,”जे ज्ञान मला वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मिळालं आहे, त्याचाच वापर करून मी ते पुढे आणलं. मी जर याचं पेटंट करून घेतलं असतं तर इलॉन मस्कपेक्षाही जास्त श्रीमंत झालो असतो.” असे म्हटले होते.
कार्यक्रमादरम्यान, आपल्या जुन्या एका विधानाबद्दल बाबा रामदेव यांनी, ‘मी एकदा बोललो होतो की स्वामी रामदेव यांचा वेळ टाटा, बिर्ला, अदानी, झुकरबर्ग, इलॉन मस्क, वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्याही पेक्षा महत्त्वाचा आहे. ते स्वतःसाठी जगतात, पण संन्यासी इतर सगळ्यांसाठी जगत असतो. त्यामुळे त्याचा वेळ, शक्ती आणि ज्ञान सगळ्यांच्या कल्याणासाठी असतं, असे सांगितले.
एवढेच नाही तर व्यापाराविषयी आणि इलॉन मस्कबद्दल बोलताना बाबा रामदेव म्हणाले, “तो म्हणतो, मी अशी गाडी बनवेन, आकाशात तुमच्यासाठी जागा मिळवून देईन. तो टेक्नोलॉजीबद्दल बोलतो, पण जे आमच्याकडे वेद, पुराण, धार्मिक पुस्तकं आणि पूर्वजांचं ज्ञान आहे, त्यामध्ये संशोधन केलं, त्याची जर नोंद केली असती तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत स्वामी रामदेव असता. पण ते ज्ञान आम्ही विश्व कल्याणासाठी दिलं आहे.”