भाजपबद्दल कदाचित शब्दाचे पालन केलं नाही म्हणून तुमच्या मनात राग असेल पण…
मुंबई: शिवसेनेला मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला असेल तर तो पूर्ण झाला पाहिजे, आणि जर शब्द दिला नसेल तर शब्द दिला असे सांगण्यात येऊ नये, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केले.
मुनगंटीवार म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द मी दिला नव्हता. शब्द ज्याने कोणी दिला असेल त्याला याबाबतची जास्त माहिती असेल, त्यावर तो व्यक्ती सांगू शकेल. पण जर शब्द दिला असेल तर तो पूर्ण झाला पाहिजे आणि जर शब्द दिला नसेल तर शब्द दिला असे सांगण्यात येऊ नये”
मुगांटीवारांनी आपल्या प्रतिक्रियेमधून शिवसेनेसोबत जवळीक साधण्याचा प्रयन्त केला. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. मात्र त्यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून राज्यात सरकार स्थापन केले.
भाजपबद्दल कदाचित शब्दाचे पालन केलं नाही म्हणून तुमच्या मनात राग असेल पण तो राग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर व्यक्त करु नका, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.