खोटे गुन्हे दाखल केले, तर गंभीर परिणाम होतील

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा इशारा : आ. पिचडांविरोधात तक्रार अर्ज दाखल

अकोले – लोकहितासाठी व तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देणारे आ. वैभव पिचड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. आ. पिचड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याअगोदर तालुक्‍यातील कालवेग्रस्त शेतकरी व प्रत्येक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. मात्र त्यामुळे होणाऱ्या परिणामास प्रशासनाने तयार राहावे, असा इशारा अकोले राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

आ. पिचड यांच्यावर निळवंडे कालवा कृती समितीने अकोले पोलीस ठाण्यात कालव्याचे काम बंद पाडल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिलेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, विठ्ठलराव चासकर, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, गोरक्ष मालुंजकर, अशोक देशमुख, प्रतापराव देशमुख, शंभू नेहे, सुरेश धुमाळ, सुभाष दामू मालुंजकर, शंकरराव वाळुंज, विकास शेटे, बाळासाहेब घोडके, अशोकराव आरोटे, रावसाहेब दौंड, बाळासाहेब घोडके, शिवाजी कोठवळ, संतोष तिकांडे, हनुमंता वाळके, गंगाधर नलावडे, अशोक राक्षे, भाऊसाहेब मोरे, राहुल देशमुख, खंडू वाकचौरे, दिलीप शेटे, सुनील दातीर, दिलीप तिकांडे, अशोक फरगडे यांच्यासह कालवेग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या नेतृत्वाने पाणी देण्याचे काम केले असून, पाणी देण्यास विरोध नसताना फक्त नेण्याच्या पद्धतीत बदल करावा, अशी रास्त मागणी असतानाही कृती समितीने असा प्रकार केला असल्याने यापुढील काळात या कृती समितीस ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा संकल्प योवळी कार्यकर्त्यांनी केला. निळवंडे धरणाचे मुख्य कालवे बंदिस्त व्हावेत, कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न व भंडारदरा पाणी प्रश्‍न, यासाठी अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला आहे. आ. पिचड यांनी निळवंडे धरणाचे कालवे हे बंदिस्त व्हावेत, अशी भूमिका मांडली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. पिचड यांनी भेट घेतली. त्यांनील वकरात लवकर विशेष बैठक लावण्याचे मान्य केले होते. मात्र ती अद्यापही झाली नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. पिचड यांनी भेट घेऊन वरील कालवाग्रस्तांच्या प्रश्‍नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. मात्र त्यानंतरही जलसंपदा विभागाने पोलीस बळाचा वापर करुन कालवे खोदाईचे काम सुरु केले होते. त्यास तालुक्‍यातून विरोध झाला. आ. पिचड यांनी संयमाची भूमिका घेत जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये वरील धरणग्रस्तांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केल्यानंतरच कालव्यांचे काम सुरु करावे, अशी भूमिका घेतली. असे असतानाही नानासाहेब जवरे व इतरांनी आ. पिचड यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. आम्ही कृती समिती व धरणग्रस्त शेतकरी याचा निषेध करतो.

या समितीचा स्थापनेचा उद्देश काय आहे, केव्हा व कोणाच्या मान्यतेमुळे ही समिती स्थापन झाली या समितीमध्ये तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी सभासद आहे काय? याचा खुलासा करावा, असे प्रश्‍न उपस्थित केले. तसेच समितीने अकोले तालुक्‍यात येऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खुली चर्चा करावी, असे आवाहन यावेळी देण्यात आले. यापुढील काळात जर या समितीने आ. पिचड यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तर जशासतसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)