डॉल्बी वाजल्यास कारवाई होणारच

पोलीस अधीक्षक सातपुते यांचा इशारा

सातारा  – यंदाही डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन झाल्यावर सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन डॉल्बीमुक्‍त वातावरणात व्हावे, असा पोलिसांचा निर्धार आहे. डॉल्बी लावणाऱ्या मंडळांची ध्वनिक्षेपक यंत्रणा तत्काळ जप्त केली जाईल तसेच संबंधितांना कारावास आणि दंडही होऊ शकतो. त्यामुळे मंडळांनी कायद्याचे पालन करावे. डॉल्बी वाजवल्यास कारवाई होणारच, असा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.

पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून गणेश मंडळ, डॉल्बीमालक आणि चालकांचे डॉल्बीमुक्‍तीसाठी प्रबोधन केले आहे. वेळोवेळी बैठका घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दहीहंडीमध्ये आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या गोविंदा पथकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने गणेशाचे आगमन आवाजाच्या मर्यादेत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले.

दरवर्षी सातारा शहरात गणपतीच्या आगमनाला एक-दोन बेसच्या नावाखाली “चोरी चोरी, चुपके चुपके’ डॉल्बीचा आवाज होतो. यंदा मात्र एसपींच्या खबरदारीने आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आवाज मर्यादित राहिला. मात्र, खा. उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी वाजणार असल्याची घोषणा नुकतीच केल्याने गणेश आगमनाची संधी हुकल्याची भावना बोलून दाखवणारी काही मंडळे विसर्जन मिरवणुकीत ऐनवेळी डॉल्बीचा दणदणाट करण्याची शक्‍यता आहे.

ही शक्‍यता गृहीत धरून जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजू नये, यासाठी मिरवणुकीआधीच विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. दोन बेस आणि दोन बॉक्‍सपेक्षा अधिक यंत्रणा उभारणाऱ्या मंडळांवर तत्काळ जप्तीची कारवाई होईल. दोन बेस आणि दोन बॉक्‍स वापरूनही आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

…अन्यथा कारवाई अटळ आहे

पोलिसांकडे 29 ध्वनिमापक यंत्रे आहेत. या यंत्रांचा वापर करणाऱ्या पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास ध्वनी यंत्रणा जप्तीची आणि डॉल्बीचालक व संबंधित मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले जातील. या अंतर्गत दोषींना सश्रम कारावास होऊ शकतो. मंडळांनी आवाज मर्यादा पाळावी अन्यथा कारवाई अटळ आहे.

-तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक

…डॉल्बी नकोच

गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच तरुणांची पसंती असली तरी काही जणांना अजून डॉल्बीचा हव्यास आहे. त्याचे दुष्पपरिणाम पाहता आमच्या मंडळाने कधी डॉल्बी वाजवली नाही. डॉल्बीच्या आवाजाचे अनेक तोटे असल्याने सर्वच मंडळांनी डॉल्बीला “बाय बाय’ करून पांरपरिक वाद्यांना पसंती द्यावी.

-प्रकाश टोपे, विश्‍वस्त, श्री. छ. प्रतापसिंह मंडळ, मोती चौक, सातारा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.