पुणे : चीनने सन १९५० मध्ये तिबेटवर आक्रमण केले. त्या वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी चीनकडून धोका असल्याचे म्हटले होते. मात्र, पुढे पं. जवाहरलाल नेहरूंनी हिंदी – चीनी भाई भाईचा नारा दिला. पुढे सन १९६२ मध्ये आपल्याला त्याची किंमत चुकवावी लागली. अलीकडे गलवानमध्ये तसे करण्याचे प्रयत्न केले. मात्र, भारताने आरे ला कारे ने उत्तर दिले. त्यामुळे आजच्या परिस्थितीत चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली, तर भारताला आणि जगालाही फायदा होईल, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
चेतक बुक्सने प्रकाशित केलेल्या आणि पराग देव यांनी लिहिलेल्या ‘ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा’ या कादंबरीचे प्रकाशन धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद मोरे होते. या वेळी लेखक पराग देव, अनय जोगळेकर उपस्थित होते.
आपल्या देशाला धोका असलेल्या देशांच्या यादीत आजही चीन नंबर एकवर आहे. त्यामुळे आपल्याला चीनचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे, असे धर्माधिकारी म्हणाले. डॉ. मोरे, जोगळेकर यांचेही भाषण झाले. लेखक देव यांनी मनोगत व्यक्त केले.