पंतप्रधानांनी घेतला १० राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा
नवी दिल्ली : देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला.
आज पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्यासह १० राज्यांतील मुख्यमंत्री उपस्थित होते.
दहा राज्यांमध्ये ॲक्टिव्ह केसेसचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या राज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही १० राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्या व्यक्तीच्या निकटसहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे ७२ तास महत्त्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसींग, टेस्टींग वाढवावे असे आवाहन पंतप्रधान यांनी केले.