कोलकाता : सीबीआयने 9 ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि पोलीस ठाण्याचे माजी प्रभारी अभिजित मंडल यांना अटक केली आहे. पुराव्याशी छेडछाड तसेच सरकारी रुग्णालयात एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्येप्रकरणी तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली होती.
यानंतर आता न्यायालयाने आरोपी संदीप घोष याला जामीन देण्यास नकार दिला आहे. तसेच संदीप घोष याच्यावर गंभीर आरोप असून ते सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. संदीप घोषची जामीन याचिका फेटाळताना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस डे म्हणाले की, आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे हे आरोप सिद्ध झाले तर मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, जी दुर्मिळ प्रकरणांमध्ये दिली जाते. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये आरोपींना जामिनावर सोडणे हे समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन ठरेल.
तसेच या प्रकरणातील आरोपींचा समाजिक स्तर पाहिल्यास त्यांच्यापैकी एकजण हा डॉक्टर असून दुसरा पोलीस अधिकारी आहे. याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र सामाजिक स्तरावरील त्यांचं वजन लक्षात घेतलं नाही तर प्रकरणाचं गांभीर्य टाळता येणार नाही. यावेळी न्यायालयाने इन कॅमेरा सुनावणी आणि आपल्या इच्छेनुसारच नार्को टेस्ट केली जावी, या दोन्ही याचिकाही फेटाळल्या.