कॉंग्रेस श्रेष्ठींनी बंडखोरांना माफ केल्यास त्यांचे स्वागतच – गेहलोत

राजस्थानमधील राजकीय तमाशा मोदींनी थांबवावा

जैसलमेर -कॉंग्रेस श्रेष्ठींनी बंडखोरांना माफ केल्यास माझ्याकडून त्यांचे स्वागतच होईल, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी म्हटले. त्यातून तरूण नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे कॉंग्रेस श्रेष्ठीही नाराज असल्याचे त्यांनी एकप्रकारे सूचित केले.

पायलट आणि कॉंग्रेसमधील त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड पुकारल्याने राजस्थानात राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. त्यातून त्या राज्यातील कॉंग्रेस सरकारची कोंडी झाली आहे. ती फोडण्यासाठी सरकारने 14 ऑगस्टपासूून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याची तयारी चालवली आहे. 

सरकारच्या पाठिशी असणाऱ्या आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी त्यांना जैसलमेरच्या रिसॉर्टमध्ये एकत्रित ठेवण्यात आले आहे. तिथे गेहलोत पत्रकारांशी बोलत होते. पायलट यांच्या बंडखोरीमागे भाजप असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने केला जात आहे.

तो धागा पकडून गेहलोत यांनी राजस्थानात सध्या राजकीय तमाशा सुरू असल्याचे म्हटले. तो तमाशा थांबवण्याचे आवाहनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यानंतर घोडेबाजाराला उधाण आले आहे.

सरकारच्या पाठिशी असणाऱ्या आमदारांना फोडण्यासाठी मोठ्या रकमेचे आमीष दाखवले जात आहे, या आरोपाचही गेहलोत यांनी पुनरूच्चार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.