मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला असून याकडे केंद्र आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कॉंग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणाचे प्रश्न तातडीने सोडवेल. कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची जात जनगणनेची मागणी या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन तोडगा काढण्याच्या आमच्या संकल्पाशी सुसंगत आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी विविध प्रश्नांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच “शासन आपल्या दारी’ योजनेवरून शिंदे सरकारवर टीका केली.
नाना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात भाजपच्या सरकारने अशांतता निर्माण करुन “जळता महाराष्ट्र’ करुन ठेवला आहे. हे अत्यंत निषेधार्ह असून राज्य जळत असताना सरकार मात्र मजा बघत आहे. सरकारमधील मंत्रीच सामाजिक शांतता भंग होईल अशी चितावणीखोर विधाने करत आहेत.
आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप हे भाजप व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. 2014 साली फडणवीस यांनीच आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. मागील 9 वर्षांत भाजपने कोणत्याच समाजाला आरक्षण दिले नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे.
कॉंग्रेस पक्ष जर राज्यात व केंद्रात सत्तेत आला तर आरक्षण प्रश्नावर मार्ग काढू. आरक्षण प्रश्नावर कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी ती जाहीरपणे मांडलेली आहे. जातनिहाय जनगणना करणे व 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे आणि कॉंग्रेस पक्षाचे सरकार आल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.