लखनौ – उत्तरप्रदेशात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास मुलींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कुटींचे वाटप करण्याची घोषणा त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरूवारी केली. त्यामुळे उत्तरप्रदेश निवडणुकीत महिलाकार्ड चालवण्यावर कॉंग्रेसचा भर असल्याचे स्पष्ट झाले.
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने प्रामुख्याने महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती आखल्याचे सूचित होत आहे. याआधी प्रियंका यांनी उत्तरप्रदेशात 40 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली.
आता आणखी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी शिक्षित तरूणींना खुष करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने नव्या घोषणेशी संबंधित त्यांचे ट्विट महत्वपूर्ण ठरले आहे. काही विद्यार्थिनींशी माझी भेट झाली. त्यांनी अभ्यासासाठी आणि सुरक्षेसाठी स्मार्टफोनची निकड बोलून दाखवली. त्यासंदर्भात कॉंग्रेसने महत्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशात आमच्या पक्षाचे सरकार आल्यास बारावी उत्तीर्ण मुलींना स्मार्टफोन, तर पदवीधर तरूणींना स्कुटी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, प्रियंका यांच्या समवेत काही महिला पोलिसांनी छायाचित्र काढले. त्यासंदर्भातही प्रियंका यांनी एक ट्विट केले. त्या छायाचित्रामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अस्वस्थ झाल्याचे वृत्त आहे. त्यांची संबंधित महिला पोलिसांवर कारवाई करण्याची इच्छा असल्याचे समजते. माझ्या समवेत छायाचित्र काढणे गुन्हा असेल; तर मला शिक्षा मिळावी. निष्ठावान महिला पोलिसांची कारकीर्द खराब करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.