नवी दिल्ली : मी घराणेशाहीवर आधारित राजकारण करत नाही असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले असून दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकून द्यायच्या आहेत असे आवाहनही त्यांनी केले.
केजरीवाल म्हणाले, जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा लोक म्हणत होते की, आता केजरीवाल त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवतील. पण मी तसे केले नाही. माझ्या पत्नीला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नाही. यासोबतच ते म्हणाले की, आम्ही ज्याला तिकीट देऊ, तो खूप विचार करूनच देणार आहोत. स्वत: केजरीवालच निवडणूक लढवत असल्याप्रमाणे तुम्हाला सर्व जागांवर मतदान करावे लागेल.
भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधत ते म्हणाले, त्यांना दिल्लीतील काम कोणत्याही प्रकारे थांबवायचे आहे. या लोकांना खूप त्रास होत आहे. आतापर्यंत ते आम्हाला शिव्या देत होते की केजरीवाल फुकट रेवडी देतात. आता तेही आमची भाषा बोलू लागले असून दोनशे युनिट वीज मोफत देणार असल्याचे अमित शहा यांनीच सांगितले आहे.भाजप आल्यास दिल्लीच्या सरकारी शाळाही यूपीसारख्या होतील.
भाजपने यूपीमध्ये २७ हजार शाळा बंद केल्याचा दावा त्यांनी केला. आप सरकारच्या कामांची माहिती देताना ते म्हणाले की, प्रत्येक गल्लीत मोहल्ला क्लिनिक सुरू झाले आहेत. सरकारी रुग्णालये आलिशान बनवली आहेत. चुकून भाजप आल्यास दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था यूपी, बिहार, हरियाणा आणि मध्य प्रदेशसारखी होईल, असे ते म्हणाले.